आयुक्त वादावर ‘मातोश्री’चा अखेर पडदा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.

ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम लागल्याचे बोलले जात आहे.

‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत उद्धव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनानेते सुभाष देसाई, महापौर मीनाक्षी शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृहनेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे आदी उपस्थित होते. या वेळी एकमेकांबद्दल कोणताही दुजाभाव न ठेवता ठाण्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचा सल्ला उद्धव यांनी सर्वांना दिला.

दरवेळी महापालिकेतील शिवसेना आणि आयुक्तांमध्ये वाद झाल्यानंतर मध्यस्थी करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे या वेळी शांत बसून होते. त्यामुळे सत्तधारी आणि प्रशासनातील वाद मिटण्यास तयार नव्हता. अखेर हा विषय मातोश्रीवर पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसह आयुक्तांना एकत्र बोलाविण्यात आले.

या वेळी महापालिकेतील काही नेत्यांनी प्रशासनाच्या विरोधात पाढा वाचला; तर आयुक्तांनीदेखील आपली बाजू मांडल्याचे कळते. सत्ताधारी आणि प्रशासनाचा वाद कायम राहिल्यास त्याचा फटका विकासकामांना बसणार असल्याने या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गेले पंधरा दिवस महापालिकेचा ठप्प झालेला कारभार आता पुन्हा नव्याने सुरू होण्याची शक्‍यता आहे.

काय आहे वाद?
गेल्या महिन्यातील महासभा सलग पाच ते सहा दिवस चालल्याने आयुक्त संतापले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवसभर महासभेत बसावे लागत असल्याने इतर कामांवर त्याचा परिणाम होत होता. त्यातच वादग्रस्त ठरलेली सभा न घेण्याची सूचना आयुक्तांनी केल्यानंतरही ही सभा सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. त्यावरून ठिणगी पडून या सभेवर महापौरांच्या सचिवांसह सर्व अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. 

राष्ट्रवादीची माघार, काँग्रेसची दिलगिरी
सुरुवातीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र एकाच दिवसात राष्ट्रवादीने आयुक्तांना आपला पाठिंबा दिला होता. तर वादग्रस्त सभेत प्रशासनाच्या विरोधात बोलणारे काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी आपण केवळ गैरसमजातून प्रशासनाच्या विरोधात बोललो असून असे बोलल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Matoshree' finally curtains on Commissioner debate!