मातृवंदने'ला हरताळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मातृवंदना योजनेसाठी रायगड जिल्ह्यात तीन वर्षांसाठी 39 हजार 693 गर्भवतींना मदत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जागृतीसाठी 2 डिसेंबरपासून "मातृवंदना सप्ताह' सुरू झाला आहे. यानिमित्ताने आर्थिक मदतीचा उपयोग गर्भवतींना होतो का, या संदर्भात पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

अलिबाग ः प्रत्येक बाळ सशक्त असावे यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान मातृवंदना योजनेनुसार गर्भवतीला सकस आहारासाठी पाच हजार रुपये देण्यात येतात. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी आर्थिक मदतीचा वापर त्यांचा पती करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मातृवंदना योजनेसाठी रायगड जिल्ह्यात तीन वर्षांसाठी 39 हजार 693 गर्भवतींना मदत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जागृतीसाठी 2 डिसेंबरपासून "मातृवंदना सप्ताह' सुरू झाला आहे. यानिमित्ताने आर्थिक मदतीचा उपयोग गर्भवतींना होतो का, या संदर्भात पाहणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ही मदत अन्य कामांसाठी वापरण्याकरिता घरातील मंडळी दबाव आणतात, अशी माहिती अनेक गर्भवतींनी दिली. 

आशा, आरोग्य सेविकांनी या पैशांचा वापर माता आणि बाळाच्या पोषणासाठीच करावा, अशा सक्त सूचना लाभार्थी महिलांना दिलेल्या आहेत. त्यानंतरही बॅंकेतून पैसे काढल्यानंतर या पैशांचा वापर घर खर्चासाठी किंवा अडीअडणींसाठी करावा लागतो, असे लाभार्थी महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे योजनेच्या मुख्य हेतुलाच हरताळ फासल्याचे स्पष्ट होत आहे. 

पनवेलमध्ये विलंबाने सुरुवात 
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मातृवंदना योजनेची सुमार कामगिरी पनवेल तालुक्‍यात झाली आहे. या तालुक्‍यात 41 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. महापालिका स्थापन झाल्यानंतर येथे आरोग्य यंत्रणेची जुळवाजुळव सुरू होती. त्यामुळे ही योजना सुरू करण्यास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

रायगड जिल्ह्यात मातृवंदना योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थेट लाभार्थ्यांना बाळंतपणात आवश्‍यक असणारा आहार घेता यावा, हा मुख्य हेतू या योजनेचा आहे. या निधीचा उपयोग अन्य कामासाठी करू नये, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. 
- अश्‍विनी मेंढे, जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री मातृत्व योजना 

अशा बाईंनी हा पैसा कोणाला न देता आहारासाठी आणि बाळाला चांगले अन्न देण्यासाठी वापरावे असे सांगितले होते; पण पहिल्या खेपेचे एक हजार रुपये पडताच घरच्यांनी काढायला सांगितले. हे पैसे त्यांनी इतर कामासाठी वापरले. असाच प्रकार आमच्या पाड्यावरील दुसऱ्या महिलांच्या बाबतीतही घडला. 
- साधना लेंडी, लाभार्थी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matruvandana unsuccess