महापौर बंगला ठाकरे स्मारक समितीकडे हस्तांतरित
मुंबई : दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयातील (राणीचा बाग) बंगल्यात राहायला जाणार आहेत.
मुंबई : दादर येथील महापौर बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक न्यासाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. एक रुपया नाममात्र भाड्याने हा अडीच एकरचा परिसर या न्यासाला देण्यात आला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयातील (राणीचा बाग) बंगल्यात राहायला जाणार आहेत.
हेरिटेज वास्तू असलेल्या महापौर बंगल्याच्या दर्शनी भागात कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे ठाकरे स्मारक भूमिगत होण्याची शक्यता आहे. अडीच हजार चौरस फुटांच्या या बंगल्याखाली सहा हजार चौरस फुटांचे बांधकाम करून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास मान्यता दिल्यानंतर सुधार समिती आणि महापालिकेची परवानगी घेऊन न्यासाला 30 वर्षांसाठी हा परिसर देण्यात आला आहे. आजवर या बंगल्यात अनेक सोहळे, राजकीय भेटीगाठी तसेच परदेशी पाहुण्यांच्या बैठका झाल्या आहेत. दरवर्षी दिवाळीनिमित्त महापौरांतर्फे निमंत्रितांना स्नेहभोजन देण्यात येते. सोमवारी झालेले स्नेहभोजन हे या बंगल्यातील शेवटचे ठरले.
महापौर बंगला ठाकरे स्मारकासाठी हस्तांतरित झाल्यास मलबार हिल येथील जलअभियंत्यांचा बंगला महापौरांना मिळावा, असा हट्ट शिवसेनेने धरला होता; मात्र त्या दोन बंगल्यांपैकी एका बंगल्यात मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले सनदी अधिकारी रहात आहेत. त्यामुळे सरकारने तो पालिकेकडे पुन्हा हस्तांतरित करण्यास नकार दिला. अखेरीस शिवसेनेने भायखळा येथील जिजामाता उद्यानातील बंगला घेण्यास होकार दिला होता.
घटनाक्रम
- 2014 : स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नियुक्त केली
- 2015 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे स्मारकासाठी महापौर निवासस्थान देण्याची घोषणा केली.
- 27 फेब्रुवारी 2017 : महानगरपालिकेच्या सुधार समितीने स्मारकासाठी महापौर निवासस्थान हस्तांतरित करण्याची परवानगी दिली.
- 6 नोव्हेंबर 2018 : स्मारक न्यासाकडे महापौर बंगला हस्तांतरित.
दृष्टिक्षेपात महापौर बंगला
- बंगल्याचे क्षेत्रफळ : सुमारे दोन हजार चौरस फूट.
- परिसराचे क्षेत्रफळ : सहा हजार चौरस फूट.
- 1928 मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला महानगरपालिकेने 1962 मध्ये विकत घेतला.
- 1964-65 पासून बंगल्याच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थान म्हणून वापर.
- डॉ. बी. पी. देवगी हे या बंगल्यात राहिलेले पहिले महापौर होते.