रुग्णवाहिका चालकाची मुलगी झाली एमबीबीएस डॉक्‍टर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

वडील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकाचालक आणि आई अंगणवाडी सेविका असलेल्या आदिवासी समाजातील सुचिका पाडवी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्‍टर झाली. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव पाडवी कटुंबावर होत आहे.

तलासरी : वडील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकाचालक आणि आई अंगणवाडी सेविका असलेल्या आदिवासी समाजातील सुचिका पाडवी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्‍टर झाली. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव पाडवी कटुंबावर होत आहे.

आदिवासी जमातींमध्ये फारच थोडी मुले डॉक्‍टर, इंजिनिअर, वकील व इतर व्यावसायिक शिक्षणापर्यंत पोहोचू शकतात; मात्र तलासरीसारख्या ग्रामीण, अतिदुर्गम गावात राहणाऱ्या सुचिताने मेहनत आणि जिद्दीच्या बळावर एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करून ती आता आदिवासी जमातीमधील महिला डॉक्‍टर झाली आहे. 
जिथे वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, अशा भागात जन्म घेतलेल्या डॉ. सुचिता तुकाराम पाडवी हिने पंधरा बाय बाराच्या सरकारी वसतिगृहात राहून आदिवासी भागातील आरोग्य सुविधेअभावी अनेक यातना सहन करणारे नागरिक बालपणापासूनच पाहिले. म्हणून तिने डॉक्‍टर होऊन या लोकांची सेवा करण्याचा निर्धार केला. सुचिताचे प्राथमिक शिक्षण तलासरी येथील ठक्कर बाप्पा आश्रमशाळेत झाले. पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, माहीम, पालघर येथे झाले. 

ही बातमी वाचा ः  राजकन्या भाग्यश्रीचा नवा अविष्कार 

अनेक अडचणींचा सामना करत उत्तम गुणांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि तिची एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय अंधेरी येथे निवड झाली. या महाविद्यालयातून सुचिताने मोठ्या जिद्दीने अभ्यासक्रम पूर्ण करत एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डॉक्‍टर पदवी प्राप्त केली. मनात जिद्द असली, तर काहीही शक्‍य होऊ शकते, हे सुचिताने दाखवून दिले. 

वडिलांची इच्छा केली पूर्ण 
आपल्या यशाचे श्रेय तिचे आई-बाबा तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व वर्गमित्र, मैत्रिणींना दिले आहे. सुचिताचे वडील तुकाराम हे ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकाचालक; तर आई अंगणवाडी सेविका आहे. वडिलांची इच्छा होती की स्वतः जसे रुग्णवाहिका चालवून हजारो लोकांचे जीव वाचवतो, त्याचप्रमाणे माझ्या मुलीने डॉक्‍टर होऊन आपल्या आदिवासी भागातील रुग्णांची सेवा करावी आणि आपल्या मुलीने इथेच न थांबता पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An MBBS doctor becomes the daughter of an ambulance driver