"कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात"

भाग्यश्री भुवड
Tuesday, 20 October 2020

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक तातडीने होण्याची गरज,  केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांचं मत

मुंबई, 20 : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे व्यक्त केले.

महत्त्वाची बातमी : दाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई

राज्यातील महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावनणीसाठी गेले दोन दिवस मुंबईत दौऱ्यावर आल्याचे सांगून शर्मा म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. तसेच कोविड सेंटरमध्ये बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या घटना झाल्याची 11 प्रकरणे केंद्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलिस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी राज्याची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असल्याचे सांगण्यात आले. एसओपीबरोबरच अन्य उपाययोजनांचेही काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

मोठा दिलासा ! उद्यापासून सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेची परवानगी मिळाली

महिलांवरील अत्याचार प्रकरणात मदत, समुपदेशन आदी सहाय्य करण्यासाठी सध्या कार्यरत असलेली वन स्टॉप सेंटर्स चांगल्या पद्धतीने काम करत असून राज्यातील उर्वरित 19 जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर्स कार्यरत करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

( संपादन - सुमित बागुल )

Measures should be taken to prevent harassment of women in Covid Centers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Measures should be taken to prevent harassment of women in Covid Centers