रोजच्या कटकटीपेक्षा रिक्षाभाडे मीटरप्रमाणेच बरे; कल्याण-डोंबिवलीच्या रिक्षाचालकांना उपरती

रोजच्या कटकटीपेक्षा रिक्षाभाडे मीटरप्रमाणेच बरे; कल्याण-डोंबिवलीच्या रिक्षाचालकांना उपरती

ठाणे - कोरोना संक्रमणात आर्थिक घडी सुरु ठेवण्यासाठी अनेक नागरिक आता घराबाहेर पडून कार्यालय गाठू लागले आहेत. परंतू त्यासाठी वाहन व्यवस्था पुरेशी नसल्याने ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना आजच्या घडीला करावा लागत आहे. शहरातील रिक्षा वाहतूक सुरु झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी शेअर रिक्षा बंद असल्याने रिक्षा भाड्याचा पूर्ण भुर्दंड एकाच ग्राहकावर येत आहे. याकारणामुळे दररोज रिक्षाचालक आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. ग्राहकांची ही नाराजी पाहून आता रिक्षा चालकांनाच मीटर प्रमाणे शहरात रिक्षा वाहतूक व्हावी याची उपरती होऊ लागली आहे. 

कल्याण डोंबिवली शहरातील रिक्षांसाठी मीटर सक्तीचे असले, तरी या दोन्ही शहरांत रिक्षातील मीटर केवळ शोभेपुरतेच आहेत. त्यामुळे रिक्षाचालक सांगेल ते पैसे मोजा अथवा उपलब्ध असेल तर रिक्षा शेअर करा असे दोनच पर्याय येथील प्रवाशांपुढे आहेत. कोरोना संक्रमणात अनलॉकच्या तीसऱ्या टप्प्यात शहरातील रिक्षाचालकांना वाहतूक सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू एका रिक्षात केवळ दोन प्रवासी बसविणे, रिक्षा सॅनिटाईज करणे आदि अटी शर्थी घालून देण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या शहरातील शेअर रिक्षा वाहतूक बंद असून एक किंवा दोन व्यक्तीच रिक्षातून प्रवास करत असून या व्यक्तींवर रिक्षाचे पूर्ण भाडे भरण्याचा भार पडत आहे. शहरातील नागरिकांची मानसिकता ही स्टेशनपर्यंत दहा ते पंधरा रुपये भाडे अशी झाली असल्याने आता अचानक रिक्षा चालकांनी 30 ते 40 रुपये होतील असे सांगताच प्रवाशांचा पारा चढत आहे. दहा रुपये सीट प्रमाणे रिक्षातून तीन ते चार प्रवासी पहीले वाहतूक करीत होते, त्यामुळे प्रवाशांचे भाडे विभागले जात होते. परंतू आता तशी परिस्थिती नसल्याने पूर्ण भाडे प्रवाशांनी दिलेच पाहीजे अशी मानसिकता रिक्षाचालकांची आहे. तर काही प्रवासी रिक्षाचालकांना आम्ही अर्ध्या रस्त्यातून रिक्षा पकडली असल्याने आमच्याकडून पूर्ण 1 किंवा 2 किमी अंतराचे भाडे घेतले जाऊ नये अशी मागणी केली जात आहे. या कारणावरुन रिक्षाचालक आणि ग्राहकांमध्ये दररोज खटके उडत आहे. 

रिक्षा भाडे सांगताच अनेकदा प्रवासी रिक्षात बसण्यास नकार देतात, आणि दोन चार रिक्षा चालकांना विचारणा केल्यानंतर अखेर पाचव्या रिक्षातून प्रवास करतात. परंतू या कारणामुळे आमच्याकडे आलेले भाडे जात असल्याने दररोजची कमाई अगदी किरकोळ स्वरुपात होत आहे. प्रवाशांनाही रिक्षाचालक त्यांची लुटमार करीत आहेत असे वाटू नये यासाठी शहरात मीटरप्रमाणेच रिक्षा वाहतूक हवी होती असे आता आम्हाला वाटू लागले असल्याचे मत रिक्षाचालक अन्वर तांबोळी यांनी व्यक्त केले. 
लॉकडाऊन आधी डोंबिवली ते कल्याण रिक्षाचे भाडे शेअर पद्धतीनुसार 25 रुपये भाडे आकारले जात होते, आता ते 50 रुपये एका व्यक्तीकडून आकारले जात आहे. यावर रिक्षाचालक महेश दुसार म्हणाले, आता केवळ दोन ग्राहकांना रिक्षातून प्रवास करण्यास परवानगी आहे. त्यातही अनेकदा ग्राहक एकट्यानेच रिक्षातून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही 75 रुपयांऐवजी 50 रुपये दर आकारत आहोत. हे आम्हालाही परवडणारे नाही. परंतू तरीही ग्राहक आमच्याच नावाने ओरड करीत आहेत. त्यामुळे मीटरनुसार रिक्षा झाल्यास खरे दर त्यांनाही लक्षात येतील व भांडण तंटे होणार असे वाटते. 

रिक्षाचालक-मालक संघटनांचे अपयश..
गेल्या कित्येक वर्षापासून कल्याण डोंबिवली शहरात मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप त्यास यश आलेले नाही. रिक्षाचालक मालक संघटनांनीही सुरुवातीला या उपक्रमास पाठींबा असल्याचे प्रथमदर्शनी भासविले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणाऱ्या चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यास संघटनांकडूनच त्यास विरोध होत होता. त्यामुळे अद्याप पर्यंत कल्याण डोंबिवलीत मीटरप्रमाणे रिश्रा चालत नाहीत.

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com