काय सांगता! मेट्रोमुळे मुंबईत मलेरियाचा प्रसार? दक्षिण मुंबईत 70 टक्के रुग्ण; इमारतींमध्येही वाढता धोका

मिलिंद तांबे
Saturday, 12 September 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असतानाच मुंबईत आता मलेरियानेही डोके वर काढले आहे. गेल्या 8 महिन्यांत शहरात एकूण 3 हजार 099 मलेरिया रूग्णांची नोंद झाली.  

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असतानाच मुंबईत आता मलेरियानेही डोके वर काढले आहे. गेल्या 8 महिन्यांत शहरात एकूण 3 हजार 099 मलेरिया रूग्णांची नोंद झाली.  यातील सुमारे 70 टक्के रुग्ण एकट्या दक्षिण मुंबईतील आहेत. या भागात मेट्रोच्या अपूर्ण कामांमुळे मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.   

सोमय्यांच्या आरोपानंतर महापौरांनी सोडले मौन; म्हणाल्या आरोप सिद्ध करा शिक्षा भोगेन

दक्षिण मुंबईतील पाच प्रभागांत मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल 2 हजार 157 रुग्ण आढळले आहेत.  येथील डी, ई, एफ, जी दक्षिण आणि जी उत्तर वॉर्डमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारतींची बांधकामं सुरू आहेत. त्याचबरोबर मेट्रोचे बांधकामही या परिसरात सुरू आहे. सध्या मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मेट्रोची कामे बंद आहेत. अशा ठिकाणी पाणी साचून मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होत आहे. या पाच प्रभागांपैकी जी दक्षिण प्रभागात 31 ऑगस्टपर्यंत सर्वाधिक म्हणजेच 1 हजार 055 मलेरिया रूग्णांची नोंद झाली. दुसरीकडे, ई प्रभागात मलेरियाचे 478 तर, एफ दक्षिण प्रभागात 267 रूग्ण आढळले आहेत. प्रभाग जी उत्तर आणि डी मध्ये अनुक्रमे 233 आणि 124 रूग्णांची नोंद झाली आहे.

नांगरे पाटील आणि दरेकरांच्या चर्चेदरम्यान आला गृहमंत्र्यांचा कॉल, मग घडलं असं की...

पावसाळ्याच्या सुरूवातीला धारावी, गोवंडी, मानखूर्द सारख्या झोपडपट्ट्यांमध्येही मलेरियाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत होते. आता इमारतींमध्येदेखील मलेरियेचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत मलेरियाच्या हॉटस्पॉट भागांमध्ये पालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी फवारणी केली जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे मलेरियाचे प्रमाण वाढत असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले आहे. 

 

कोरोनाची लक्षणे मलेरियासारखीच आहेत. त्यामुळे मलेरियाच्या उपचारासाठी येणा-या रूग्णांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. मुंबईत एकाच व्यक्तीला मलेरियानंतर कोरोना बाधा झाली आहे. तर, काहींना मलेरिया आणि कोरोना असे दोन्ही आजार होत आहेत. त्यामुळे लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
- डॉ राहून घुले,
प्रमुख, वनरूपी क्लिनिक

 

दक्षिण मुंबईत अनेक बंद जुन्या मिल, इमारती आणि कंपाऊंड आहेत. लॉकडाऊनमुळे या ठिकाणी फवारणी होऊ शकलेली नाही. अशा ठिकाणी डासांची पैदास होत असल्याचे दिसते. पालिका यासाठी जबाबदार मालकांना नोटीस देणार आहे. अनेक ठिकाणी पालिकेने फवारणीस सुरूवात केली आहे.
- सुरेश काकाणी ,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro spreads malaria in Mumbai 70 per cent patients in South Mumbai