आरेमधील कारशेडचा वाद पुन्हा पेटणार? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप परब यांनी दिला.

मुंबई : आरे वसाहतीमधून मेट्रो-3 ची कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का, याबाबत राज्य सरकारने समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, कारशेड अन्य ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य होणार नसल्याची शिफारस केली आहे. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

आरे वसाहतीमधील मेट्रो कारशेडसाठी एका रात्रीत 2000 झाडे तोडण्यात आली होती. त्याला पर्यावरणप्रेमींनी प्रचंड विरोध केला होता व शिवसेनेनेही विरोध दर्शवला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली व अभ्यास करण्यासाठी चार जणांची समिती नेमली होती. या समितीने मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे.

मेट्रो-3 प्रकल्पातील कारशेड आरे वसाहतीमधून इतर ठिकाणी घेऊन जाणे व्यवहार्य नसल्याचे या समितीने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आरे वसाहतीमधील कारशेडचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तेथे कारशेडचे काम पुन्हा सुरू झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप परब यांनी दिला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करणे बंधनकारक नसल्याचे सांगितले. अहवालाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: metro/mumbai/politics/shiv-sena-promotes-ashwini-bhide-clash-on-aarey-carshed