गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन

टीम ई सकाळ
Wednesday, 7 April 2021

७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, गिरणी कामगारांना घर मिळावे म्हणून लढा देणारे गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते आणि राष्ट्र सेवादल कार्यकर्ते दत्ता इस्वलकर गेली तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. मेंदूतील रक्ताश्राव गोठल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शरिराने त्यांना साथ न दिल्याने सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 2 ऑक्टोबर 1989 साली गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी संघर्ष करण्यास सुरुवात केली. याच दिवशी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. ते आजपर्यंत समितीचे अध्यक्ष होते.

बंद पडलेल्या दहा गिरण्या 1988-90  दशकात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सुरु केल्या. त्यांनी गिरणी कामगारांना स्वेच्छा निवृत्ती पोटी चांगले पैसेही मिळवून दिले. गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे आणि रोजगार मिळावा म्हणून 1999 सालापासून आजपर्यंत संघर्ष सुरु होता. 15 हजार गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासह गिरणी चाळीतील 7 ते 8 हजार रहिवाशांना घरे मिळवून दिली. दत्ता सामंत यांच्यानंतर त्यांनी गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या निधनाने गिरणी कामगारांसह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mill Union Leader Datta Iswalkar passes away Mumbai JJ Hospital

टॉपिकस
Topic Tags: