
मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाच नामनिर्देशत नगरसेवकांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्दबातल केला
मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेच्या एका नामनिर्देशित नगरसेवकाची नियुक्ती रद्द केली म्हणून सरसकट पाच नामनिर्देशत नगरसेवकांच्या नियुक्ती रद्द करण्याच्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज रद्दबातल केला.
मिरा-भाईंदर महापालिकेत पाच नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी मागील वर्षी जानेवारीमध्ये आदेश जारी केले होते. यामध्ये भाजपचे अजित पाटील, अनिल भोसले व भागवती शर्मा यांच्यासह शिवसेनेचे विक्रमप्रताप सिंह व कॉंग्रेसतर्फे शफिक अहमद खान यांच्या नावांची शिफारस आयुक्तांनी केली. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी महापालिकेच्या सभेत ठराव संमत करून सिंह वगळता अन्य चार जणांच्या नियुक्ती कायम करण्यात आली.
मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
विक्रम सिंह हे प्रताप फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. या संस्थेला पालिकेने लॉकडाऊनच्या काळात फूड पॅकेट पुरवण्याचे कंत्राट दिले होते. त्यामुळे त्यांना नामनिर्देशित नगरसेवक करता येणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ या पाचही नियुक्त्यांच्या स्थगितीचा आदेश काढला. भाजपचे गटनेते नगरसेवक हसमुख गहलोत यांनी या निर्णयाला विरोध केला आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या.आर.डी. धनुका आणि न्या.व्ही.जी. बिश्त यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने स्थगिती आदेश अवैध ठरवून रद्दबातल केला आहे. तसेच मंत्र्यांनी संबंधित नगरसेवक आणि तक्रारदार यांना आठ आठवड्यात सुनावणी घेऊन फेरनिर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत. या फेरनिर्णयाच्या अंमलबजावणीवर आणखी चार आठवडे स्थगिती दिली आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
----------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
mira bhayandar marathi Mumbai High Court Eknath Shinde cancel the appointment of nominated corporators