मिरा भाईंदरच्या भाजपा महापौरांचे आमदाराशी पटेना!

महेश पांचाळ
सोमवार, 1 मे 2017

महापालिका अंतर्गत एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश महापौर जैन यांनी दिले असताना, महेता यांनी ही कारवाई होउ नये यासाठी महापालिकेवर दबाव टाकला.त्यातून महापौर जैन आणि आमदार मेहता यांच्यात ठिणगी पडली असे समजते.

मुंबई:  मिरा भाईंदरच्या भाजपा महापौर गीता भरत जैन आणि स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील शीतयुदधाचा फटका ऑगस्टमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपाला बसण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात शतप्रतिशत: भाजपाची सत्ता आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेश भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आता जैन आणि मेहता यांच्यातील वाद कसा मिटवावा याची चिंता लागली आहे.

दोन दिवसापूर्वी भाईंदर येथील भाजपाच्या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. या कार्यक्रमाला पक्षाच्या महापौर असतानाही गीता जैन या थोड्या उशीरा पोहचल्यानंतर, नरेंद्र मेहता आणि जैन यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा राजकीय वर्तुळात नव्याने सुरु झाली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेत भाजपचा महापौर तर शिवसेनेचा उपमहापौर आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सध्या बुरे दिन असल्याचे बोलले जाते. एकेकाळी मिरा भाईंदरमध्ये दबदबा असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोसा सध्या जमिन घोटाळा प्रकरणात कारागृहात आहेत. 

राष्ट्रवादीचे काही विद्यमान नगरसेवक सेना किंवा भाजपात प्रवेश करत आहेत. ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होण्याची शक्‍यता आहे. परंतु, भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मिरा भाईंदर महापालिकेची प्रमुख जबाबदारी असली तरी गेल्या काही दिवसात भाजपाचे महापौर गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा फटका भाजपाला बसण्याची शक्‍यता आहे. 

अपक्ष म्हणून राजकारणात आलेल्या नरेंद्र महेता यांना तत्कालीन आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांनी मोठी साथ दिली होती. मिरा भाईंदरचे महापौर पदही महेता यांना मेन्डोसा यांच्या पाठिंब्यामुळे मिळाले होते. मात्र, मेन्डोसा आणि मेहता यांच्यात संबंध बिनसल्यानंतर मेहता हे भाजपामध्ये गेले होते. गीता जैन यांच्या सासऱ्यांच्या मंडळीचा गेले अनेक वर्षे मिरा भाईंदरमध्ये बांधकाम व्यवसाय असून, भाजपामध्ये जैन कुटुंबियांबाबत चांगला सलोखा असल्याने गीता जैन यांना महापौर पदी निवड झाली होती.

महापालिका अंतर्गत एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश महापौर जैन यांनी दिले असताना, महेता यांनी ही कारवाई होउ नये यासाठी महापालिकेवर दबाव टाकला.त्यातून महापौर जैन आणि आमदार मेहता यांच्यात ठिणगी पडली असे समजते. जैन आणि मेहता यांच्या वादामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला पुर्ण बहुमत मिळू शकणार नाही अशी भीती भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही वाटू लागली आहे. 

मेहता यांनी आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे, दुखावलेल्या जैन यांना शिवबंधनात आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. जैन यांच्यासोबत अनेक भाजपाच्या महिला नगरसेवक मेहता यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे, येत्या दोन महिन्यात जैन आणि मेहता यांच्या वादावर तोडगा निघाला नाही तर भाजपा त्याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mira bhayandar mayor in tussle with BJP MLA