आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या कॉलने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

निनावी फोन आल्यानंतर आमदार निवासातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. जवळपास 150 लोकांना बाहेर काढल्यानंतर प्रत्येक खोलीची कसून तपासणी करण्यात आली.

मुंबई - आकाशवाणी आमदार निवासात मध्यरात्री 12 च्या सुमारास आलेल्या एका निनावी फोनने खळबळ उडाली होती. मंत्रालयाशेजारीच असलेलं आकाशवाणी आमदार निवास मध्यरात्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा तो कॉल होता. या कॉलनंतर तात्काळ आमदार निवास रिकामं करण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झालं. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं फोन करून आमदार निवास बॉम्बने उडवून देणार असं सांगितलं. त्यानंतर आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रभर बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेतला. मात्र कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत. आता पोलिस फोन करून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात असून लवकरच कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. 

 

दरम्यान, निनावी फोन आल्यानंतर आमदार निवासातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. जवळपास 150 लोकांना बाहेर काढल्यानंतर प्रत्येक खोलीची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आमदार निवासापासून 50 मीटर अंतरापर्यंत बॅरिकेटही लावण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA hostel receive bomb threat call in mumbai police investigate