ठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब

ठाण्यातील सेंट्रल पार्कसाठी मनसे आक्रमक; रखडपट्टीबद्दल पालिका आयुक्तांना विचारला जाब

ठाणे  : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून "कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात ढोकाळी येथील 20 एकरचा भूखंड एका विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला आहे. 2017 मध्ये येथे उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु आज तीन वर्षे उलटूनही हे सेंट्रल पार्क ठाणेकरांना उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे हे सेंट्रल पार्क ठाणेकरांना मिळणार का, ते विकासकाच्या घशात घालण्याच्या डाव नाही ना, असा सवाल करत मनसेचे शहर उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना निवेदनाद्वारे जाब विचारला आहे. 

ठाणे पालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ढोकाळी भागात 20 एकरवर सेंट्रल पार्क उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. या संदर्भातील प्रस्तावही 2017 मध्ये झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. यातून ठाणेकरांना बाहेर कुठेही न जाता येथेच पर्यटनाचा आनंद मिळावा, हा हेतू होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 2017 मध्ये या प्रस्तावित पार्कचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षात हे पार्क ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. सेंट्रल पार्कचे काम "कन्स्ट्रक्‍शन टीडीआर'च्या बदल्यात विकासकाला देण्यात आले होते. परंतु आजही हे काम पूर्ण का होऊ शकले नाही, असा सवाल विचारे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. 

खासगी प्लॉटची "अशीही' विक्री! 
संबंधित विकासकाने आपल्या गृहसंकुलातील प्लॉटची विक्री करण्यासाठी हे पार्क गृहसंकुलाचाच एक भाग असल्याचे भासवून प्लॉटचीही विक्री केल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे हे पार्क विकासक घशात घालणार, याबाबत शंका निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन हे पार्क आता ठाणेकरांसाठी आहे की, विकासकासाठी याचे उत्तर मिळणे गरजेचे असल्याचे पुष्कराज विचारे यांनी निवेदनातून म्हटले आहे. उत्तर न मिळाल्यास आम्हाला या पार्कसाठी आंदोलन उभे करावे लागेल, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला आहे..

MNS aggressive for Central Park in Thane asked the Municipal Commissioner about delay 

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com