Vidhan Sabha 2019 : पटेलांचे स्मारक उभे राहिले मग आता शिवरायांचे स्मारक कधी?; राज ठाकरे यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

ज्या शिवछत्रपतींमुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले. हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

कल्याण : ज्या शिवछत्रपतींमुळे महाराष्ट्राची ओळख आहे त्यांचे अरबी समुद्रातील स्मारक बाजूला राहिले आणि चीनमधून तयार केलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक मात्र उभे राहिले. हे नेमके काय चालले आहे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांसाठी राज यांनी कल्याण येथे जाहीरसभा घेतली. पावसाचे सावट असतानाही सभेसाठी तरुणवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहत राज्यांच्या भाषणातील प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवत उस्फूर्त प्रतिसाद दिला. भिवंडीहून कल्याणला सभास्थानी येताना या वाहतूक कोंडीचा त्यांना सामना करावा लागला. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत टीका केली. आपल्याबरोबर असलेल्या पोलिसांना सलाम करत त्यांनी या खड्ड्यातून सर्वसामान्य नागरिक कशी वाट काढतो यावर आश्चर्य व्यक्त केले.

विविध चॅनेल्सवर सभेचे थेट प्रक्षेपण असतानाही झालेल्या गर्दीने राज काहीसे सुखावले. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेतील युतीमधील भाजप-सेना युतीतील बेबनावावर भाष्य करत आम्ही आपले ठणठणीत बरे असे राज यांनी सांगितले. केंद्रातील सरकारवर टीका करत असतानाच राज यांनी राज्य सरकारच्या कामाच्या पद्धतीवरही तीव्र शब्दांत भाष्य केले.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर स्मारकाचे पुढे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. आपण जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहोत. आपल्याला शिल्पकलेचेही ज्ञान आहे, असे सांगत राज यांनी सरकारच्या घोषणेचे वाभाडे काढले. केंद्रातील आणि राज्यातील बडे नेते एकत्र येऊन समुद्रात या स्मारकासाठी भूमिपूजन केले. मात्र, त्याचे पुढे काय झाले? असेही राज यांनी विचारले.

चीनविरुद्ध देशात रान माजवले जात असतानाच सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा मात्र चीनमधून तयार करून कसा आणला गेला? असा प्रश्न राज यांनी केला. मनसेने ज्या विषयांमध्ये हात घातला त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला, असे राज्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांना खाटकांची उपमा देताना लहरीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर शंभरवेळा विचार करायला लावणारा विरोधीपक्ष असावा, यासाठी मनसेला संधी द्यावी, असे आवाहनही राज यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray Criticizes State Government on Memorial Issue