esakal | Virar Hospital Fire: राज ठाकरे म्हणाले, ''ही घटना दुर्देवी आणि क्लेशदायक''

बोलून बातमी शोधा

Mns chief raj thackeray
Virar Hospital Fire: राज ठाकरे म्हणाले, ''ही घटना दुर्देवी आणि क्लेशदायक''
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. या आगीत १३ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. विरार येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून काही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समजून व्यथित झालो. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो आणि जखमी रुग्णांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो, असं म्हणत राज्यपालांनी घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा: Virar Hospital Fire: १३ मृतांची नावे आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहोचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यांशी बातचीत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवून आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्निसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

या आग दुर्घटनेवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील घटनेची चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरार रुग्णालयातील घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं म्हणत सरकारकडून योग्य ती मदत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुढे राजेश टोपे म्हणाले की, आयसीयूत १७ जणांवर उपचार सुरु होते. रुग्णालयातील आगीत १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पाच महिला तर ८ पुरुषांचा समावेश आहे. दरवाजाजवळच्या चार रुग्णांना वाचवण्यात यश आलं असून एसीचा स्फोट झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटात आयसीयूमध्ये धूर झाला.