esakal | मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणतात...गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणतात...गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं त्यांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणतात...गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना अडचणी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गणेशोत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रश्नही आणखीन गंभीर होत चालला आहे. यावरुनच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था तसंच क्वारंटाइन कालावधी यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कोकणातील चाकरमान्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे. कोकणात जाण्यासाठी शासनाने काहीच व्यवस्था केली नसल्याचं त्यांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आहेत, पण बकरी ईद साजरी करणाऱ्यांना सुविधा दिल्या जात आहेत अशी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी लोक जात असतात. पण त्यांना गावी जाण्यासाठी सरकारकडून कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. परराज्यांतील लोकांना पाठवण्याची व्यवस्था केली आणि ते जाऊन परत आले देखील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

राज्य सरकार काही व्यवस्था करु शकत नसेल तर आम्ही बसेसची व्यवस्था करु, सरकारने आम्हाला परवानगी द्यावी असंही ते म्हणालेत. 

हेही वाचाः तब्बल 14.82 कोटींचा मामला, मुंबई पोलिस विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन येणार आमनेसामने?

गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याचा मुद्दा उचलून धरला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यात उडी घेतली आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

अधिक वाचाः  मुंबईत कोरोनाची दहशत कायम, रुग्णवाढ नियंत्रणात तर मृत्यूदरात वाढ

दरम्यान आताच आलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची व्यवस्था करण्यात येणार आहे. काही अटी आणि शर्तींवर ही व्यवस्था करून देण्यात येणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

MNS leader Sandeep Deshpande criticizes Thackeray government

loading image