मनसेचं पोलिसांना ओपन चॅलेन्ज, 'वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा'

पूजा विचारे
Wednesday, 6 January 2021

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असा थेट आव्हान संदिप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे.

मुंबईः सोमवारी वसईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातला. यावेळी पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मारहाण केली. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदिप देशपांडे संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असा थेट आव्हान संदिप देशपांडे यांनी पोलिसांना दिलं आहे.  सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन संदीप देशपांडे यांनी पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून देशपांडे यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला आहे. 

पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी नेहमीच मनसे उभी राहत आली आहे, याची आठवण संदीप देशपांडेंनी करून दिलीय. तसंच  मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणीही संदिप देशपांडेंनी केली आहे.  सरकारचे दलाल असल्यासारखे वागू नका, असंही ते म्हणालेत. 

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसेचा राडा

आयुक्त साहेब आम्हाला वेळ द्या, आयुक्त साहेब आम्हाला वेळ द्या असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात दोन मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी घोषणाबाजी करत राडा केला. मनसेच्या घोषणा भर कार्यक्रमात होताच तुलिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तात्काळ दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढलं. मनसेच्या या घोषणाबाजीने काहीवेळ कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम वसई पूर्व वसंत नागरी मैदानावर आयुक्त गंगाथरण डी यांच्या पुढाकारातून ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरचे  जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकूण 30 परिवहन सेवेच्या बसचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा होता. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या बस नव्या ठेकेदारामार्फत महापालिकेच्या माध्यमातून सोमवारी अधिकृतपणे 43 मार्गावर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

mns leader sandeep deshpande video warning police eknath shinde


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader sandeep deshpande video warning police eknath shinde