योगेश पाटील उचलणार 350 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

मनसे पदाधिकारी तथा घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी याची त्वरित दखल घेत वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत घारीवली, काटई, उसरघर आणि संदप या 4 गावातील 350 शालेय विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलला आहे.

डोंबिवली: लॉकडाऊनमुळे डोंबिवली जवळ असलेल्या  27 गावांतील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करणे अवघड झाले आहे. ही बाब गावकऱ्यांनी मनसे पदाधिकारी तथा घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी याची त्वरित दखल घेत वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत घारीवली, काटई, उसरघर आणि संदप या 4 गावातील 350 शालेय विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलला आहे.

चक्रीवादळात नुकसान झालेल्या घारीवलीतील शाळेच्या छताचे पत्रेही पाटील यांनी स्वखर्चाने बसवून दिले.  कोरोना सारख्या आरोग्य संकटात पाटील हे गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे झाले असल्याने कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही त्यांचे कौतुक केले.

27 गावातील शाळा या जिल्हा परिषद आस्थापनेच्या अंतर्गत येत असल्याने त्यांना केडीएमसी शाळेप्रमाणे सुविधा व इतर लाभ मिळत नाही. या शाळांमध्ये शिकणारी मुले ही गरीब घरातली आहेत. तसेच कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे पालक हतबल झाल्यामुळे वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च उचलून सामाजिक कार्यात मी एक खारीचा वाटा उचलला आहे, असे योगेश पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns leader yogesh patil education material help to 350 student at dombivli