ठाण्यात ईव्हीएमविरोधात मनसे रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

ठाणे : मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. १) मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, असे ठणकावून सांगितले. त्याप्रमाणेच मनसेने सरकारला ‘पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असा इशारा यावेळी दिला. सर्वसामान्यांच्या मनांत या प्रक्रियेबद्दल अनेक शंका आहेत.

पारदर्शकतेचा डंका पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी लोकभावनेचा आदर करून मतदान प्रक्रिया निःसंशय आणि पारदर्शक करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यांत येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात पुष्कर विचारे, नैनेश पाटणकर, संदिप पाचंगे, सुशांत डोंबे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

ईव्हीएमविरोधात जलसमाधी
कल्याण : राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध पक्ष प्रमुखांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्यावतीने देण्यात आला आहे. सुभाषचंद्र बोराडे, डॉ. प्रवीण बोदडे, प्रभाकर कोंगळे, बाळू उबाळे, उत्तम भोसले, प्रभाकर दोंदे यांच्या शिष्टमंडळाने आज  उपविभागीय अधिकारी नितीन महाजन यांची भेट घेत निवेदन दिले. दरम्यान, याची माहिती निवडणूक आयोगाला त्वरित देण्यात येईल, असे नायब तहसीलदार रवींद्र बोंबे यांनी सांगितले. ९ ऑगस्ट रोजी शंभर कार्यकर्ते जलसमाधी घेणार असल्याचा इशारा मिशनतर्फे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS morcha against EVM in Thane