मनसेचे डोंबिवलीत आंदोलन, स्थानकाबाहेरचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं

शर्मिला वाळुंज
Monday, 21 September 2020

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी यासाठी सोमवारी मनसेच्यावतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्याना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरच अडविले. 

मुंबईः सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी यासाठी सोमवारी मनसेच्यावतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्याना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरच अडविले. 

कोरोना काळात रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेच्या काही विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. खासगी तसेच अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मात्र लोकल प्रवासास मुभा नव्हती. अनलॉकच्या टप्प्यात सर्व कार्यालये, आस्थापने सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी रस्ता वाहतूकीवर पूर्णपणे अवलंबून रहावे लागत आहे. मात्र वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरावस्था यामुळे चाकरमान्यांचा अधिकाधिक वेळ हा प्रवासातच खर्ची होत आहे. शहरातील इतर सुविधा सुरु केल्या जात असताना मुंबईची लाईफलाईन रेल्वे सेवाही सर्वांसाठी सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. मात्र सरकार अद्याप त्यावर ठोस निर्णय घेत नसल्याने चाकरमान्यांचे दररोज हाल होत आहेत. अखेर मनसेने प्रवाशांच्या मागणीला साथ देत सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सुरु कराव्यात ही मागणी केली. याच मागणीसाठी सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले.

रेल्वे प्रवासी संघटनेनेही मनसेच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनीही यापूर्वीच राज्य शासनाला रेल्वे सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार न केल्यास रस्त्यावर उतरुन घंटानाद आंदोलनाचा इशाराही प्रवासी संघटनांनी दिला आहे. मात्र प्रशासन अद्यापही प्रवाशांच्या समस्यांना गांर्भियाने घेताना दिसत नाही. मनसेच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले त्याला सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी पाठींबा दर्शविला असल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

हे आंदोलन करण्यापूर्वीच रविवारी मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना स्थानिक पोलिस स्टेशन आणि रेल्वेनं नोटीसा बजावल्या होत्या. कायद्याचा भंग केल्यास गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला गेला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी मनसे प्रदेश अध्यक्ष राजेश कदम, नगरसेवक प्रकाश भोईर, प्रल्हाद म्हात्रे, राहुल कामत, दीपिका पेडणेकर, संदीप म्हात्रे यांसह मनसेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------

(संपादनः पूजा विचारे)

MNS protest Dombivali Activists in police custody


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS protest Dombivali Activists in police custody