esakal | एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ताब्यात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात दोन मनसे कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी करत राडा केला.

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा, घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ताब्यात

sakal_logo
By
विजय गायकवाड

मुंबई:  आयुक्त साहेब आम्हाला वेळ द्या, आयुक्त साहेब आम्हाला वेळ द्या असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात दोन मनसे कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी करत राडा केला. मनसेच्या घोषणा भर कार्यक्रमात होताच तुलिंज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी तात्काळ दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढण्यात यश मिळविले. मनसेच्या या घोषणाबाजीने काहीवेळ कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम वसई पूर्व वसंत नागरी मैदानावर आयुक्त गंगाथरण डी यांच्या पुढाकारातून ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरचे  जिल्हाधिकारी माणिकराव गुरसळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकूण 30 परिवहन सेवेच्या बसचा नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा होता. लॉकडाऊन च्या काळात बंद झालेल्या बस नव्या ठेकेदारा मार्फत महापालिकेच्या माध्यमातून आज अधिकृतपणे 43 मार्गावर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा- धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग, लोकलमधून ढकलून देण्याचा प्रयत्न करणारा आरोपी अटकेत

गंगाथरण डी यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यापासून आपली मनमानी चालवली असल्याचा आरोप सत्ताधारी बविआ, मनसे, सामाजिक कार्यकर्ते, आणि सामान्य नागरिकांकडून वारंवार होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने वसई विरार नालासोपारा या तिन्ही ठिकाणी एकाचवेळी बंद असणाऱ्या परिवहन सेवेचे उद्घाटन करून बस सुरूही करण्यात आली होती. पण पुन्हा आज महापालिकेच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करून, 30 नव्या बसचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सत्ताधारी आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर,माजी  स्थायी समिती अध्यक्ष हे कोणीही उपस्थित नव्हते. या पदाधिकारी यांना आयुक्तांनी विश्वासात न घेता हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा आरोप सताधारी पक्षाने केला आहे.

परिवहन सेवेच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे एकनाथ शिंदे यांचे भाषण संपताच दोन मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातील मनसेचे रुमाल काडून, गळ्यात घालून, आयुक्त साहेब जनतेला वेळ द्या असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कार्यक्रमाच्या बाहेर काढले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या बसचे उद्घाटन केले. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आयुक्त हे केवळ शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी, आमदार, कार्यकर्ते यांना झुकते माप देत आले आहेत. मागच्या 6 महिन्यापासून जनतेच्या प्रश्नावर बोलण्यासाठी आम्ही आयुक्तांना वेळ मागत आहोत पण ते आम्हाला वेळ देत नाहीत. कार्यालयात वेळ देत नसल्याने शेवटी आम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी वेळ मागितला होता, आम्ही वेळ मागण्यांसाठी जाणार म्हणून वसई पोलिसांनी आमच्या 350 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते त्यामुळे आम्ही त्याठिकाणी पोहचू शकलो नाही. पण आमच्या दोन बहद्दरणी ते काम केले याचा अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिल्या आहेत. तसेच आयुक्तांच्या  कार्यकाळात अनाधिकृत बांधकाम झपाट्याने वाढले आहेत. हे आयुक्त जनतेच्या हितापेक्षा भ्रष्ट्राचार करणाऱयांना पोसत आहेत. असल्याचा आरोप ही जाधव यांनी केला आहे. 

मनसे कार्यकर्त्यांना तुलिंज पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अविनाश जाधव पोलिस ठाण्यात आल्यावर पोलिस आणि जाधव यांच्यात ही बाचाबाची झाली. काही वेळा नंतर 168 कलमाखाली ताब्यात घेतलेल्या दोन मनसे कार्यकर्त्यांना कलम 169 नुसार सोडून देण्यात आले आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

MNS workers slogans Eknath Shinde program activists arrested avinash jadhav

loading image