मनसेच्या बॅनरबाजीचा सरकारला शॉक! बेस्ट कर्मचाऱ्यांसह पोलिसांची धावाधाव

मिलिंद तांबे
Sunday, 22 November 2020

वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, त्यांनी सरकारला आंदोलनाचा शॉक देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, त्यांनी सरकारला आंदोलनाचा शॉक देण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून मनसेने सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर फलकबाजी केली. फलक काढण्यासाठी बेस्टसह पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

हेही वाचा - ओबीसींचे प्रश्न सोडवण्यास सरकार कटिबद्ध! कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. वाढीव वीजबिल कमी करावे या मागणीसाठी मनसेने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. जनतेचा रोष पत्राच्या माध्यमातून पोचवण्याचा निर्णय मनसे माहीम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी घेतला आहे. उद्या (ता. 23) हे आंदोलन होणार असून, त्यासाठी मनसेने शिवाजी पार्क, दादर, माहीम परिसरातील बेस्टच्या बसथांब्यांवर मोठ्या प्रमाणावर फलकबाजी केली. 
फलकबाजीच्या माध्यमातून मनसेने सरकारच्या "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या घोषवाक्‍याची खिल्ली उडवली. माझे वीजबिल, माझी जबाबदारी अशी टीकात्मक वाक्‍यरचना करून सोमवारी बघा कसा शॉक लागतो, अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. सरकार तसेच थेट शिवसेनेच्या विरोधात फलकबाजी केल्याने पोलिसांसह बेस्ट प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. 

हेही वाचा  खरेदी कक्षातील अधिकाऱ्यांमुळे कोट्यवधीची बिले थकली! औषध वितरकांचा आरोप

रीतसर परवानगीने फलकबाजी! 
मनसेच्या या फलकबाजीची मुंबईसह राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली. बेस्ट प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शिवजी पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बेस्ट प्रशासनाच्या मदतीने बसस्थानकांवरील सर्व फलक हटवले. तसेच अशाप्रकारचे अवैध फलक न लावण्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. याबाबत बोलताना किल्लेदार यांनी सांगितले की, जनतेचा रोष सरकारपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न सफल झाला आहे. आम्ही रीतसर पैसे भरून फलक लावल्याने ते अवैध नाहीत. ही सुरुवात असून आंदोलनाचा खरा शॉक हा सोमवारी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

MNSs anti government boards on best stand

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNSs anti government boards on best stand