esakal | दुष्काळ निवारणासाठी व्हॉटसअॅपसह आधुनिक तंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

दुष्काळ निवारणासाठी व्हॉटसअॅपसह आधुनिक तंत्र

- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  बोलावली पत्रकार परिषद.

दुष्काळ निवारणासाठी व्हॉटसअॅपसह आधुनिक तंत्र

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. 

तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर गतिमान प्रशासनातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसा हातभार लागू शकतो, याचे प्रत्यंतर ‘संवादसेतू’ या उपक्रमातून लक्षात यावे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 6 दिवसांत 27,449 लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले आणि अगदी प्रत्येक तक्रारीचे निवारण होते की नाही, याचीही व्यवस्था उभारली गेली आहे.

गेले 6 दिवस ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून 139 तालुक्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांना पोहोचता आले. एकूण 22 जिल्ह्यांतील हे तालुके आहेत. या 22 जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, परभणी, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, धुळे, बुलढाणा, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वर्धा, नागपूर, वाशीमचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे हा संवादसेतू आयोजित करण्यात आला. या संवादसेतूमध्ये मुख्यमंत्री जेव्हा प्रत्यक्ष सरपंचांशी संवाद साधत, तेव्हा राज्याचे मुख्य सचिव, दुष्काळी उपाययोजनांशी संबंधित खात्यांचे प्रधान सचिव इत्यादी अधिकारी मुंबईला हजर राहत आणि जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, ग्रामसेवक हे सारे त्या कॉलवर उपलब्ध असायचे.

अनेक ठिकाणी पालक सचिवांनी सुद्धा त्या-त्या जिल्ह्यांतून या आढाव्यात हजेरी लावली. त्यामुळे सरपंचांनी मांडलेली तक्रार एकाचवेळी स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, मुख्य सचिव, पालक सचिव आणि मुख्यमंत्री ऐकू शकत होते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश हे प्रत्यक्ष सरपंचालाही कळत होते.

अशारितीने प्रत्यक्ष 884 सरपंच थेट मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. ज्यांना संवादात सहभागी होता आले नाही, त्यांच्यासाठी विविध व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या 22 जिल्ह्यांना एकूण 17 व्हॉटसअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. या व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून 13 मेपर्यंत सुमारे 4451 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित 2359 तक्रारी होत्या.

या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यासाठी सुद्धा एक कार्यपद्धती अवलंबविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र एक्सेल शीट तयार करण्यात आली आहे. त्यात तक्रार, मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश, स्थानिक प्रशासनाने केलेली कारवाई असा प्रत्येक जिल्ह्यातील कार्यवाही अहवाल हा थेट मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या प्रत्येक तक्रारीच्या निवारणासाठी पाठपुरावा करण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय जे प्रश्न धोरणात्मक बाबींशी निगडित आहेत, त्यावरही निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने ‘एकमेकांना देऊ साथ-दुष्काळाशी दोन हात’ हा उद्देश यातून साध्य करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

दिवस : 6
जिल्हे : 22
एकूण तालुके : 139
लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचा सहभाग : 27,449
प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांशी बोललेले सरपंच : 884
व्हॉटसअ‍ॅपवर तक्रारींसाठी उपलब्ध क्रमांक : 17
व्हॉटसअ‍ॅपवरून प्राप्त तक्रारी (13 मे 2019 पर्यंत) : 4451
प्रत्यक्ष दुष्काळाशी संबंधित तक्रारी : 2359

loading image