राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनच भागवतांसाठी पायघड्या

शुक्रवार, 30 मार्च 2018

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटुंबीय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. आरएसएसवर नेहमीच टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसाठी पायघड्या घातल्याने राष्ट्रवादीच्या या नव्या समरसतेची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटुंबीय राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. आरएसएसवर नेहमीच टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून आरएसएस प्रमुख मोहन भागवतांसाठी पायघड्या घातल्याने राष्ट्रवादीच्या या नव्या समरसतेची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. 

सध्या दिल्लीत भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेससह डाव्या आघाडीची मोट बांधण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मग्न आहेत. त्याचवेळी राज्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व त्यांचे संपूर्ण तटकरे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या स्वागताला सज्ज झाले आहेत. 31 मार्च रोजी हनुमान जयंतीच्या मुहर्तावर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मोहन भागवत यांनी निमंत्रण देण्यात आले आहे. 

हे निमंत्रण दुसरं तिसरं कोणी दिले नसून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कन्या व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी दिले आहे. विशेष म्हणून कार्यक्रम पत्रकेवर मोहन भागवतांचा उल्लेख "पुजनीय" असा केल्याने राष्ट्रवादीसाठी आरएसएस प्रमुख पुजनीय कधीपासून झाले असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 

गेल्या वर्षी सुनील तटकरे यांच्यावरच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यावरून राष्ट्रवादीवर व मुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमांना मुख्यमंत्री व भाजपच्या मंत्र्यांना बोलावणार नसल्याचे जाहिर केले होते. 

मात्र, आता खुद्द आरएसएसच्या प्रमुखांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निमंत्रण देत पायघड्या अंथरल्या आहेत.रायगडावर होणाऱ्या शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह त्यांचे बंधू अनिल तटकरे, त्यांचे पुत्र अवधूत तटकरे आदींचा प्रमुख उपस्थीतांमध्ये समावेश आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक तटकरेंची कन्या आदिती तटकरे या आहेत. त्यामुळे संपुर्ण तटकरे कुटंबियच या कार्यक्रमाला उपस्थित राहून संघ परिवारप्रमुख मोहन भागवत यांचे विचार ग्रहण करणार असल्याचे दिसत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mohan bhagwat invited on raigad organised by ncp leader