'मोमो' म्हणजे मरणच!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - गतवर्षीच्या "ब्ल्यू व्हेल'च्या धुमाकुळानंतर यंदा "मोमो चॅलेंज' गेममुळे अर्जेंटिनात एका तरुणीचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या गेममध्ये अतिशय भयंकर, हिंसक व्हिडिओ, फोटो, ऍनिमेशन्स पाठवून ब्रेनवॉशद्वारे हिंसक कृत्त्यांसाठी प्रवृत्त केले जाते. यातील शेवटचा टास्क आत्महत्येला प्रवृत्त करणारा असतो.

समाजमाध्यम तज्ज्ञ शेखर पाटील यांनी सांगितले की, "ब्ल्यू व्हेल' चॅलेंजमध्ये वेबसाइट, मेसेंजर, चॅटिंग ग्रुप्स आदींच्या माध्यमातून सूत्रधार कार्यरत असे. "मोमो' चॅलेंजमध्ये मात्र विशिष्ट क्रमांकावरून सूत्रधार काम करत असतो. म्हणजे या क्रमांकाच्या व्हॉट्‌सऍप अकाउंटवर जाऊन मेसेज केल्यानंतरच हा गेम खेळता येतो. कुणीही उत्कंठेसाठी या प्रकारचा मेसेज करताच या अकाउंटवरून त्या व्यक्तीला व्हॉट्‌सऍपवर अतिशय भयंकर व हिडीस असे व्हिडिओ, मेसेज व इमेज येऊ लागतात. यातूनच त्या व्यक्तीला विविध टास्क दिले जातात.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते "ब्ल्यू व्हेल' चॅलेंजमध्ये एकलकोंड्या स्वभावाचे टीन एजर्स जास्त बळी गेल्याचे दिसून आले आहे. मुळातच पौगंडावस्थेचा कालखंड हा खूप विचित्र असतो. शरीर आणि मनातील बदलांमुळे कुणीही गोंधळून जात असतो. याच वयात फॅंटसी भुरळ घालत असते. परिणामी कुणीही आपल्या भोवतालापासून पळ काढून आभासी विश्‍वात रममाण होण्याचा प्रयत्न करत असतो. यातून कुणी "मोमो' चॅलेंजसारख्या गेमच्या नादी लागल्यास त्याचे आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ शकते.

विख्यात जपानी शिल्पकार मिदोरी हयाशी यांनी "मोमो' या नावाने एक शिल्प तयार केले आहे. यावरूनच "मोमो चॅलेंज' या आत्मघातकी गेमसाठी क्रॉप करून "मोमो'ची भयावह प्रतिमा वापरली आहे.

संवाद महत्त्वाचा
अशा धोकादायक गेमपासून बालके व कुमार वयातील मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. घरात तसेच घराबाहेरही सुसंवाद असल्यास कुणीही "मोमो' चॅलेंजसारख्या विकृतीला बळी पडणार नाही.

Web Title: Momo Challenge Game Dangerous