esakal | गरिबांचा पुरणपोळीचा घास हिरावला 
sakal

बोलून बातमी शोधा

गरिबांचा पुरणपोळीचा घास हिरावला 

होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि कुटुंबीयांच्या जेवणात गोडधोड म्हणून या उत्सवात प्रत्येक घरात पुरणपोळी करण्यात येते. त्यासाठी चणाडाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु जिल्ह्यात चणाडाळीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा हा प्रकार सुरू असल्याचे येथील शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. 

गरिबांचा पुरणपोळीचा घास हिरावला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : होळी म्हणजे पुरणपोळी असे समीकरण आहे. यंदा मात्र, रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्यांना या मिष्टान्नाची चव चाखता येणार नाही. शिधावाटप केंद्रांवर यासाठी लागणाऱ्या चणाडाळीचे वितरणच झाले नाही. त्यामुळे ही स्थिती आहे. केंद्रांवर दर महिन्याला तांदूळ आणि गव्हाबरोबर स्वस्त दरात डाळी पुरवल्या जातात. या महिन्यात पुरवठा विभागाकडून डाळीची मागणीच करण्यात आली नाही. 

होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि कुटुंबीयांच्या जेवणात गोडधोड म्हणून या उत्सवात प्रत्येक घरात पुरणपोळी करण्यात येते. त्यासाठी चणाडाळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु जिल्ह्यात चणाडाळीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा हा प्रकार सुरू असल्याचे येथील शिधापत्रिकाधारकांचे म्हणणे आहे. 

धक्कादायक : महिलेच्या पोटात कोकेन 

अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो डाळ 35 रुपयांत मिळते. गणपतीच्या सणानिमित्ताने तूरडाळीचे वाटप केले जाते; तर मार्च महिन्यात चणाडाळीची मागणी असते. रायगड जिल्ह्यात 81 हजार कार्डधारक आहेत. त्यांना 800 क्विंटलची गरज असताना रायगड पुरवठा शाखेकडे केवळ 26.64 क्विंटल चणाडाळ मागील महिन्याची शिल्लक आहे. ती मागणीच्या खूपच कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतांश गरीब कुटुंबांना चणाडाळीचा पुरवठा होणार नाही.

होळीनिमित्ताने रेशन दुकानांवर धान्याचे वितरण केले जात आहे; परंतु यात चणाडाळीचा समावेश नसल्याने रेशनकार्डधारक नाराज होत आहेत. 
खुल्या बाजारात चणाडाळीची किंमत 125 रुपयांपर्यंत आहे. ही डाळ विकत घेण्याची ऐपत नसणाऱ्यांची पुरती निराशा झाली आहे. 

या महिन्यात चणाडाळीची मागणीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे मार्च महिन्यासाठी ती कमी प्रमाणात शिल्लक आहे. तिचा पुरवठा करण्यात येणार आहे. 
- मधुकर बोकडे, पुरवठा अधिकारी, रायगड 

शिधावाटप केंद्रावर चणाडाळ मिळेल, या आशेवर होते. परंतु दुकानदाराने चणाडाळ आलेलीच नाही, असे सांगितले. त्यामुळे आता खुल्या बाजारातून अधिक किंमत देऊन ती विकत घ्यावी लागणार आहे. गौरी-गणपतीच्या सणातही डाळीचा तुटवडा केला जातो किंवा काळ्या बाजारात विकली जाते, असे प्रकार रायगड जिल्ह्यात वारंवार घडत आहेत. 
- सुंगधा नाईक, अंत्योदय कार्डधारक, अलिबाग 

रेशनकार्डधारकांवरील दृष्टिक्षेप 
कार्डधारक 81 हजार 962 
लाभार्थी 13 लाख 90 हजार 290 

शिल्लक असलेली चणाडाळ (क्विंटलमध्ये) 
पेण- 7 
कशेळे- 9.75 
तळा- 1.59 
श्रीवर्धन- 8.3 
................ 
एकूण 26.64  


 

loading image
go to top