ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण अधिक 

राहुल क्षीरसागर
Tuesday, 11 August 2020

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, या आजारावर यशस्वी मात करूत स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची, तर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, या आजारावर यशस्वी मात करूत स्वगृही परतणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची, तर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 

क्लिक करा : रुग्णालये नको रे बाबा; कोरोनाच्या भीतीमुळे नॉनकोव्हिड रुग्णांची शस्त्रक्रियांकडे पाठ

ठाणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत कमालीची वाढ झाली. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. 11) 99 हजार 158 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 81 हजार 52 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भिवंडी, उल्हासनगर यांसारख्या शहरांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्‍यात येत असली तरी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत मात्र प्रादुर्भाव कायम आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर असलेल्या ठाणे महापालिकेला मागे टाकत, कल्याण-डोंबिवली महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 4 हजार 329 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 3 हजार 470 रुग्ण उपचार घेत आहेत.

नक्की वाचा : पावसाच्या लहरीपणामुळे पारंपरिक भातशेतीला छेद; भिवंडीत प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग

ठाणे महापालिका क्षेत्रात 2 हजार 857 रुग्ण उपचार घेत आहेत. मिरा-भाईंदरमध्ये 1 हजार 628, ठाणे ग्रामीणमध्ये 1 हजार 482, उल्हासनगरमध्ये 629, अंबरनाथमध्ये 378, बदलापूरमध्ये 337 आणि भिवंडीत केवळ 219 रुग्ण उपचार घेत आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित लाखांच्या पार 
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एक हजार 51 रुग्णांची; तर 53 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या एक लाखाच्या पार गेली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख 209; तर मृतांची संख्या आता दोन हजार 831 झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती
ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 278 रुग्णांसह 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल मिरा भाईंदरमध्ये 204 रुग्ण, 6 मृत्यू; कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 196 रुग्ण, 10 मृत्यू; ठाणे पालिका हद्दीत 174 बाधित, 4 मृत्यू; भिवंडी महापालिका क्षेत्रात 18 बाधितांसह 3 मृत्यू; उल्हासनगरात 19 रुग्णांची, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये 29 रुग्ण, 2 मृत्यू; बदलापूरमध्ये 30 रुग्ण, 2 मृत्यू; ठाणे ग्रामीण क्षेत्रात 103 जणांना कोरोनाची लागण झाली असून सर्वाधिक 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठाणे पालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू 

  • मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात येत असली तरी या आजाराने प्रतिदिन सरासरी 9 ते 14 रुग्ण दगावत असल्याचे समोर आले आहे.
  • जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक 700 रुग्ण ठाणे पालिका क्षेत्रातील आहेत. त्या खालोखाल नवी मुंबईत 471, कल्याण-डोंबिवलीत 448, मिरा-भाईंदरमध्ये 318, भिवंडी 259, ठाणे ग्रामीणमध्ये 205, अंबरनाथमध्ये 166, उल्हासनगरमध्ये 159, तर सर्वात कमी 51 जणांचा मृत्यू बदलापूरमध्ये झाला आहे. 
  • ------------
    (संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More corona active patients in Kalyan-Dombivali than Thane