मातृप्रेमातील रंगछटांनी  भारावले ‘गुरुकुल’!

मुकेश धावडे
सोमवार, 15 मे 2017

वडाळा - मातृदिनी आपल्या आईला काहीतरी भेट द्यावी, असे लहान मुला-मुलींना नेहमीच वाटत असते. लालबाग-परळ येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टने या मुलांच्या संकल्पनेला साकारण्यासाठी आगळा-वेगळा उपक्रम राबवला. त्यातूनच मुलांचे मातृप्रेम कागदावर उमटले, त्यात मायेचे रंगही भरले गेले. आपल्या समोरच बसलेल्या आईचे चित्र रेखाटून या मुलांनी अनोखी भेट दिली आणि सारे ‘गुरुकुल’ भारावले.  

लालबाग-परळ येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या बालचित्रकार जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच विविध चित्रे रेखाटत असतात. त्यांच्या या कामगिरीची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. नेहमीच अनोखी चित्रे रेखाटून त्यांचे प्रदर्शन करणाऱ्या या बालचित्रकारांची आईला अनोखी भेट देण्याची संकल्पना आखली होती. १७० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आपल्या आईचे चित्र रेखाटून ते तिलाच मातृदिनी भेट म्हणून दिले. मातृदिनी मिळालेल्या या अनोख्या भेटीने त्यांची आई भारावून गेली. कौतुकासाठी तिने आपल्या लाडक्‍याला-लाडकीला कवटाळून घेतले आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. मुंबईतील विद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही लालबाग येथील गुरुकुल स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत आहेत. यासाठी वयोमर्यादेचे बंधन नाही; मात्र यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे, असे गुरुकुल स्कूलचे प्रशिक्षक सागर कांबळी यांनी सांगितले. 

चित्रकार हा जिज्ञासू कलाकार आहे. त्याच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी गुरुकुल स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली. येथे शिक्षण घेणाऱ्या बालचित्रकारांना जगभरातील विविध घडामोडींवर व्यक्त होण्याची संधी मिळते. मातृदिनी घेतलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे आई-मुलांचे नाते आणखी दृढ होण्यास मदत होईल.

- पृथ्वीराज कांबळी, अध्यक्ष, गुरुकुल

Web Title: Mother's day wadala