पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांत दहशत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

पालघरमध्ये काम बंद; रुग्णांचे नातेवाईक, समाजकंटकांकडून धमकी, मारहाण होत असल्याची तक्रार

पालघर ः येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्‍टर आणि इतर कर्मचारी यांना काही रुग्णांचे नातेवाईक, समाजकंटक यांच्याकडून मारहाण करणे, ब्लेड मारणे, रिव्हॉल्व्हर काढून धमकी देणे, महिला कर्मचाऱ्यांना अश्‍लील शिवीगाळ करणे, विनयभंग करणे आदी प्रकार नेहमीच घडतात. त्यानंतरही वरिष्ठ प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरसह सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असूनही येथील डॉक्‍टर आणि इतर कर्मचारी काम करत आहेत; मात्र काही रुग्णांचे नातेवाईक, समाजकंटक रात्रीच्या वेळी मद्य प्राशन करून डॉक्‍टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून धमकी देण्याचे प्रकार येथे नेहमीच घडत आहेत. या प्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास एक जण महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून गेला. त्याने तिला शिव्याही दिल्या. त्यामुळे येथे काम करणे कठीण होत असून, रात्रीच्या वेळी सेवा देणे कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे.

त्यामुळे या रुग्णालयात तत्काळ दोन सशस्त्र पोलिस दिवस-रात्र नियुक्त करावेत. दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी आजपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे वैद्यकीय अधीक्षक गावित यांनी सांगितले. काम बंद आंदोलन सुरू केले असले तरी गंभीर रुग्णांची सेवा सुरू ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंजूर २५ पैकी नऊ पदे रिक्त
सध्या रुग्णालयात तीन डॉक्‍टर असून ते कंत्राटी आहेत. एकही डॉक्‍टर कायमस्वरूपी नाही. वैद्यकीय अधीक्षक पद आहे; मात्र सहायक अधीक्षक पद मंजूर असूनही रिक्त आहे. सात परिचारिका मंजूर असून, त्यापैकी सहा कार्यरत आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद मंजूर असून तेही रिक्त आहे. कक्षसेवकाची चार पदे मंजूर आहेत; मात्र त्यातील तीन रिक्त आहेत. सफाई कामगारांची दोन्ही पदे रिक्त आहेत. एकूण २५ पदे मंजूर असून, त्यापैकी १६ पदे भरलेली असून नऊ पदे रिक्त आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of doctors and staff of Palghar Rural Hospital