खादीच्या तिरंग्यासाठी फेसबुकवर चळवळ!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

प्लास्टिक झेंड्यावर बंदी आणण्यासाठी ‘विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’ अशी चळवळ फेसबुकवर सुरू झाली आहे...  

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी आपण तिरंगा अभिमानाने मिरवतो. कागदी ध्वज फाटतो, तर बंदी असूनही प्लास्टिकचा झेंडा सर्रास वापरला जातो. राष्ट्रध्वजाचा असा अवमान थांबवण्यासाठी नागरिकांनी केवळ खादीचा ध्वज वापरावा म्हणून ‘विजयी विश्‍व तिरंगा प्यारा’  लोकचळवळ फेसबुकवरून सुरू झाली आहे. 

देशात पूर्वी केवळ खादीचा तिरंगा वापरण्याची परवानगी होती. कालांतराने कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आले. राष्ट्रध्वजाचे स्वरूप आणि आकाराबाबत निश्‍चित नियम आहेत; परंतु अनेकदा त्यांचे काटेकोर पालन होत नाही. ती एक प्रकारे राष्ट्रध्वजाची अवहेलना आहे, अशी खंत विनायक राजेशिर्के यांनी व्यक्त केली. 
कागद आणि प्लास्टिकऐवजी राष्ट्रध्वजासाठी खादीचाच वापर करायला हवा. खादीच्या कापडाचा पुनर्वापर करता येतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, असेही राजेशिर्के यांनी सांगितले.

बंदी असूनही प्रदूषणकारी प्लास्टिकचे झेंडे बाजारात येतात. नागरिकांकडून त्यांची खरेदीही केली जाते. कागदी झेंडा पर्यावरणस्नेही असला, तरी तो फाटल्यास अवमान होतो. त्यामुळे कागदी आणि प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज उत्पादनावर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर बंद होण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही राजेशिर्के यांनी सांगितले.

गणेशोत्सवात जनजागृती
केवळ खादीच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्याचे आवाहन समाजमाध्यमांवरून आणि प्रत्यक्षही करत आहोत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत जाऊन जनजागृती करण्यात येत आहे, असे विनायक राजेशिर्के यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement on Facebook for Khadi tricolor!