
मुलुंडला स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार
मुलुंड : पूर्व उपनगरातील मुंबईचे शेवटचे टोक असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड रेल्वे स्थानकाला स्वच्छ रेल्वे स्थानक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. २७ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वेच्या सभागृहामध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक शलभ गोयल यांच्या हस्ते मुलुंड रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक एम. एल .गौर यांनी स्वच्छ स्थानकाचा पुरस्कार स्वीकारला मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता अभियानांतर्गत स्थानक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
यात स्वच्छतेच्या निकषानुसार मुलुंड स्थानकाला १०० पैकी ९६ गुण मिळाले आहेत. त्यांनतर मध्य रेल्वेवरील पहिले हरित स्थानक म्हणून नावारुपाला आलेल्या आसनगाव (९०) स्थानकाला द्वितीय आणि, तर माटुंगा (९०) रेल्वे स्थानकाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारासाठी स्थानक, स्थानक परिसराची स्वच्छता, स्वच्छता गृहांची व्यवस्था आदी निकष यात ठेवण्यात आले होते. यात रेल्वेच्या विभागीय समितीचे सदस्य वर्षभरात विविध स्थानकांची पाहणी करतात. त्यातून स्वच्छतेच्या निकषांचा आढावा घेतला जातो.
मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड हे महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. सकाळ-सायंकाळी प्रवाशांची मोठी वर्दळ स्थानकातून होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलुंड स्थानक परिसराची स्वच्छता आठ कामगारांकडून केली जाते. दररोज स्थानक परिसरामध्ये झाडलोट करण्यात येते. याशिवाय फलाट आणि पादचारी पूल आठवड्यातून दोनदा पाण्याने स्वच्छ केले जातात. स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने `प्रिन्स ऑफ सबर्ब` अशी ख्याती असलेल्या मुलुंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नियमित देखभाल
मुलुंड रेल्वे स्थानकातून सुमारे हजार लोकल ये-जा करतात. तसेच सुमारे अडीच लाख प्रवाशांची दररोज स्थानकातून वर्दळ असते. ४ फलाट, ४ पूल, २ प्रतीक्षागृह, २ सरकते जिने, २ लिफ्ट आणि १ प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन, पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छता गृह आदी सोयीसुविधा आहे. या सर्वांची देखभाल नियमितपणे केली जाते. मुलुंड स्थानक परिसराबाहेरील कचरा दररोज महापालिकेद्वारे गोळा केला जातो आणि तो पुढे डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.
मुलुंड स्थानक खूपच स्वच्छ ठेवले जाते. त्यामुळे प्रवास करताना समाधान मिळते. इतर स्थानकापेक्षा मुलुंडमध्ये सोयीसुविधाही चांगल्या आहेत.
- गिरीश पाठक, मुलुंड
मुलुंड स्थानकामधील प्रसाधनगृह आणि फलाट खूप स्वच्छ ठेवले जातात. या स्थानकाला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळाल्याचा मुलुंडकर म्हणून अभिमान वाटतो.
- सुनील शर्मा, मुलुंड
Web Title: Mulund Railway Station Central Railway Line Won First Place Clean Railway Station Competition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..