
Mumbai : स्थानकांवर मेटल डिटेक्टरची वानवा
मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. तरी या हल्ल्याची जखम मुंबईकरांच्या मनात अजूनही कायम आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मुंबई शहर तीन दिवस दहशतीच्या विळख्यात होते. शहरातील कामा रुग्णालय, सीएसएमटी रेल्वेस्थानक, ताज हॉटेलसह दोन लक्झरी हॉटेल्सना दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य बनवले होते. या हल्ल्यात १६६ नागरिक मारले गेले, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. हल्ला होऊन इतका काळ उलटूनही आज मुंबई कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न उरतोच. सध्याची परिस्थिती कशी आहे याचा आढावा ‘सकाळ’ने घेतला आहे. त्याचाच हा रिपोर्ट...
सीएसएमटी स्थानक
२६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाला हल्ल्याचे पहिले लक्ष्य केले होते. या हल्ल्यानंतर सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या संदर्भात सुरक्षेच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात या उपाययोजना लागू करण्यात आल्या; परंतु सुरक्षेच्यादृष्टीने आजही सीएसएमटी स्थानकावर उपाययोजना अपुऱ्या आहेत. स्थानकावर प्रवेश करताना तीन प्रवेशद्वार आहेत; परंतु या तीनही प्रवेशद्वारांपैकी २ प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर मशिन बसविण्यात आलेल्या नाहीत. फक्त बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी असलेल्या प्रवेशद्वारावर या मशिन रेल्वे फलाटावर प्रवेश करण्याआधी लावण्यात आलेल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फलाटावर पुरेसे सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले नाहीत.
चर्चगेट स्थानक
पश्चिम रेल्वेचे मुख्यालय, तसेच मुंबईला पश्चिम उपनगराशी जोडणारे आणि वर्दळीचे सर्वात मोठे ठिकाण मानले जाणारे स्थानक म्हणून चर्चगेट रेल्वेस्थानकाची ओळख आहे. चर्चगेट स्थानकात प्रवेश करण्यासाठी दोन महत्त्वाची मुख्य प्रवेशद्वार आहेत. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारचे मेटल डिटेक्टर मशिन किंवा सुरक्षा रक्षक नाही. जे मेटल डिटेक्टर मशिन बसवले आहेत, ते फलाटावर जाण्यापूर्वी बसवण्यात आले आहेत. याच स्थानकाच्या इमारतीत रेल्वेचे कार्यालय आहे. अशा परिस्थितीत हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे.
दादर रेल्वेस्थानक
दादर हे सीएसएमटीनंतर महत्त्वाचे टर्मिनस मानले जाते. दादर रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यासाठी मुख्य एकच प्रवेशद्वार आहे; तर दादर पूर्व आणि पश्चिम यांना जोडणाऱ्या पुलावरून एक प्रवेशद्वार स्थानकात प्रवेशासाठी आहे. पुलावरील प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारचे मेटल डिटेक्टर मशिन किंवा सुरक्षा रक्षक नाही. तिकीट घरासाठी जे प्रवेशद्वार आहे तेथेसुद्धा मशिन आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव आहे. स्थानकातील मुख्य प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर मशिन लावलेले आहेत; परंतु तिकीट गृह किंवा स्थानकाचा परिसर येथे सुरक्षेच्या बाबतीत उदासीनता पाहायला मिळते.