#AareyForest आदित्य ठाकरे ट्रोल; शेकडो कार्यकर्ते ताब्यात 

Aarey forest
Aarey forest

मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता तुमची, सरकारमध्ये तुम्ही, युतीतही तुम्ही; मग विरोध कशाला, असा जाब नेटकऱ्यांनी विचारला. आरेमध्ये आंदोलन करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शिवसेनेला धास्ती 
शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेला कोस्टल रोड पर्यावरणरक्षणाच्या मुद्द्यावरून अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत कारशेडचा विरोध प्रखर केल्यास कोस्टल रोड अडचणीत येऊ शकतो, अशी शिवसेनेला धास्ती वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आरे वसाहतीतील 2700 झाडे कापली जाणार आहेत; तर महापालिका उभारत असलेल्या कोस्टल रोडमुळेही अशाच प्रकारचे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. सध्या या कामालाही स्थगिती आहे. शिवसेनेने आरे कारशेडचा मुद्दा लावून धरला तर भाजपकडून शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्‍ट अडचणीत आणला जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली ही लढाई फक्त दाखवण्यापुरतीच आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

आरे वसाहतीतील सुमारे चारशे झाडे तोडल्यानंतर येथे पर्यावरणप्रेमींनी मोठे आंदोलन केले. सुरवातीपासूनच "आरे'मधील वृक्षतोडीविरोधात भूमिका घेणारे शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही ट्‌वीट करत, वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ नष्ट करायला पाठवा, अशी गर्जना केली. नाशिकमध्ये असलेल्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही वृक्षतोडीवरून भाजपला धारेवर धरले; तर या प्रकाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेना धाव घेणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले. मात्र, यापुढे शिवसेनेने काहीही केले नाही. 

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील रिफायनरी रद्द करण्याच्या अटीवरच शिवसेनेने भाजपशी युती केली आहे. "आरे'तील मेट्रोच्या कारशेडलाही शिवसेनेने सुरवातीपासून विरोध केला. मात्र, प्रत्यक्ष युती करताना "आरे'मधील कारशेड रद्द करा, अशी अट ठेवली नाही. युतीची चर्चा सुरू असताना "जे नाणारचे झाले तेच आरेचे होणार' अशी घोषणा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती; पण शुक्रवार रात्रीपासून "आरे'तील झाडे कापण्यास सुरवात केली. त्या वेळीही शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्याव्यतिरिक्त काहीच झाले नाही. शिवसेनेचा कोणताही मोठा नेताही या भागात फिरकला नाही. शिवसेनेकडून विरोध असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्‍विनी भिडे यांनी कारशेडची बाजू लावून धरली. 

'आरे'प्रकरणी 29 अटकेत; परिसरात जमावबंदी 
मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्वांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रातोरात जवळपास 400 झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. ही माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी गोरेगाव "आरे'त धाव घेतली आणि ठिय्या आंदोलन केले. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरणप्रेमींना न जुमानता पोलिस आणि प्रशासनाने कारवाई केली. आंदोलन करणाऱ्या जवळपास 100 जणांना पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील 29 जणांविरोधात (23 पुरुष व सहा महिला) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरेचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून, कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिस शिपाई इंगळे यांना मारहाण झाल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 29 जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेकडो कार्यकर्ते ताब्यात 
आरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सुमारे 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरवात करण्यात आली आहे. या अगोदर दुपारी जितेंद्र आव्हाड यांनी वृक्षतोडीवरून भाजप-शिवसेनेवर निशाणा साधत, पडणारे प्रत्येक झाड हे त्यांचा एक आमदार पाडेल आणि याची जाणीव सरकारला झाली पाहिजे, असे म्हटले होते. शिवाय त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात आपला एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com