ACB : उपविभागीय पोलीस अधिकारी अटकेत, 25 लाखांची रोख जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bribe crime

ACB : उपविभागीय पोलीस अधिकारी अटकेत, 25 लाखांची रोख जप्त

मुंबई : परभणीतील (Parbhani) उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस नाईकाला दोन कोटी रुपयांची लाच (Bribe) मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली. तक्रारदार व्यावसायिकाची एक ध्वनीफीत व्हायरल झाली होती. त्या ध्वनीफीतीवरून तक्रारदाराविरोधात (Complainant) कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अटकेनंतर एसीबीने अधिका-याच्या दादर (Dadar) येथील फ्लॅटमध्येही शोध मोहिम राबवली. तेथून 25 लाखांची रोख जप्त करण्यात आली आहे. (Mumbai ACB Arrested sub divisional police officer in bribe allegations-nss91)

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, परभणीतील सेलू विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल(55) व पोलिस नाईक गणेश चव्हाण(37) अशी अटक आरोपींची ओळख पटली आहे. 3 मेला तक्रारदाराच्या मित्राला दुर्घटनेत मृत्यू झाला होता. याप्रकरणी परभणीतील सेलू पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात एकाला स्थानिक पोलिसांनी अटकही केली होती. त्यावेळी तक्रारदाराने त्याच्या कर्मचा-याच्या दूरध्वनीवरून मृत मित्राच्या पत्नीला दूरध्वनी केला होता. त्यात काही वादग्रस्त संवाद झाले. ते संभाषण या कर्मचा-याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. त्यानंतर त्याने एका दुस-या कर्मचा-याला पाठवले व त्यानंतर ते संपूर्ण परभणीत वायरल झाले. त्यानंतर पाल याने तक्रारदाराला त्याच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यावेळी तुझी वायरल झालेली क्लीप मी ऐकली असून त्यातून बाहेर पडायचे असल्यास मला दोन कोटी रुपये दे, अशी मागणी पाल यांनी केली.

हेही वाचा: BMC: मुंबईत १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला सुरुवात, जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर तडजोडी अंती दीड कोटी रुपये स्वीकारण्यास पाल तयार झाले. त्यानंतरही पाल तक्रारदाराला नियमीत दूरध्वनी करून पैशांची मागणी करत होते. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्यामुळे अखेर तक्रारदाराने याप्रकरणी थेट मुंबई एसीबी व महासंचालक कार्यालयात येऊन याबद्दल तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मुंबई एसीबीच्या पथकाने सापळा रचून प्रथम पाल यांचा सहकारी पोलिस नाईक चव्हाणला लाचेची पहिला 10 लाखांचा हफ्ता स्वीकारताना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर पाल यांनाही शनिवारी पहाटे याप्रकरणी अटक करण्यात आली. या अटकेनंतर पालच्या मुंबईतील दादर येथील निवासस्थानी शोध मोहिम राबवण्यात आली. तेथे 25 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. त्यामुळे याप्रकरणी असंपदेचा गुन्हाही दाखल करता येऊ शकतो का, याबाबत एसीबी पडताळणी करत आहेत.

Web Title: Mumbai Acb Arrested Sub Divisional Police Officer In Bribe Allegations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top