मुंबई : गिरीशिखरांवर पुन्हा चढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरीशिखरांवर पुन्हा चढाई

मुंबई : गिरीशिखरांवर पुन्हा चढाई

मुंबई : कानावर घोंगावणारा सोसाट्याचा वारा, गवतात हरवलेली पायवाट, शरीराचे सामर्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेला आव्हान देणारी उभी चढाई; तर कधी उंचीवरून थेट दरीत घेऊन जाणारी खोल उतरण, अशा आव्हानात्मक परिस्थितीत गिर्यारोहकांचे आवाज सह्याद्रीच्या कड्यांवर पुन्हा घुमू लागले आहेत. पावसाळ्यानंतर थंडीची चाहूल लागताच सुट्ट्यांच्या दिवशी अनेक तरुण ठाणे आणि रायगड जिल्ह्यात दुर्गभ्रमंतीला येऊ लागले आहेत. प्रबळगड (कलावंतीन दूर्ग), इर्शाळगड, कर्नाळा किल्ला यांना गिर्यारोहकांकडून अधिक पसंती मिळत आहे.

गिर्यारोहकांच्या समुहांचे डोंगर, गड-किल्ल्यांवरील मुक्काम सत्र पुन्हा सुरू झाले आहेत. पनवेल शहरापासून अवघ्या १५ किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या डोंगररागांवर निसर्गभ्रमंती करण्यास तरुणांकडून अधिक पसंती मिळत आहे. एकीकडे माथेरानचे घनदाट जंगल, डावीकडे हाजीमलंगच्या डोंगररांगा, उजवीकडे इर्शाळगड आणि समोर पसरलेल्या नवी मुंबई-पनवेलच्या काँक्रिटच्या जंगलाचे एकाचवेळेस दर्शन घडवणाऱ्या प्रबळगडावर सध्या गिर्यारोहक मोठ्या संख्येने येत आहेत. जून्या मुंबई-पुणे महामार्गालगत शेडुंग फाट्याहून प्रबळगडाच्या दिशेने जाता येते. ठाकूरवाडीपासून या डोंगरावरील चढाईला सुरुवात होते. दोन डोंगरांचा प्रवास करून अखेर दगडाच्या उभ्या सुळक्यात कोरलेल्या दगडी पायऱ्यांनी प्रबळगड सर करावा लागतो. या गडावरील उभी चढाई पावसाळ्यात अधिकच धोकादायक होते. दाट धुक्यात आजूबाजूच्या तीनशे फुट खोलींच्या बुडालेल्या दऱ्या आणखीनच जीवघेण्या होतात; तरी सुद्धा हा ट्रेक तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

मोरबे धरणाच्या शेजारी चौक गावातून जाणारा इर्शाळगडही पर्यटकांमध्ये तेवढाच आवडीचा आहे. डोंगरकपारीतून पायवाटेने चालत गेल्यावर मोरबे धरणाच्या अंथांगतेचे सहज दर्शन होते. रसायनीमध्ये माणिकगडचा ट्रेक प्रसिद्ध आहे. या गडावरील शिवकालीन बांधकाम आणि पाण्याच्या टाक्या पाहण्याजोगे आहेत. याच रांगेत पेशवाईतील पहारेकरी म्हणून ओळख असणारा कर्नाळा किल्ला नजरेस पडतो. कर्नाळा किल्ल्यावरील तटबंदी, उभा दगडी सुळका, त्याला लटकलेले मधमाशांचे पोळे, खाली १२ महिने भरलेले पाण्याचे कुंड आणि नजर पोहोचेल तिथपर्यंत हिरवाईने नटलेला दाट जंगल, हे दृश्य गिर्यारोहकांना सुखावणारे असते. माथेरान हे देखील गिर्यारोहण आणि निसर्गभ्रमींतीसाठी चांगले ठिकाण आहे.

खबरदारी घ्या

  • एखाद्या संस्थेसोबत ट्रेकिंगला जाणे केव्हाही चांगले

  • पुस्तकांचे वाचन करून ट्रेकिंगसाठी ठिकाणे निवडा

  • लोकांनी लिहिलेले

  • अनुभव वाचा

  • डोंगर, गडावर जाताना शक्यतो गावातील लोकांना सांगून जा. जेणेकरून अपघात झाल्यास शोधायला मदत मिळते.

अनेकदा ट्रेकिंगला जाताना गिर्यारोहकांकडे अर्धवट माहिती असते. अशा परिस्थितीत ते डोंगर, गड-किल्ल्यांवर चढतात; मात्र त्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही. गुगल मॅपवर असे रस्ते मिळत नाहीत. काही लोक एकटेच जातात. त्यामुळे पूर्ण खबरदारी घेऊनच ट्रेकिंगला जायला हवे

- सचिन शिंदे, निसर्गमित्र संघटना, सदस्य

loading image
go to top