esakal | रूग्ण बरे होत आहेत, पण...; टास्क फोर्सने व्यक्त केली भीती

बोलून बातमी शोधा

रूग्ण बरे होत आहेत, पण...; टास्क फोर्सने व्यक्त केली भीती

रूग्ण बरे होत आहेत, पण...; टास्क फोर्सने व्यक्त केली भीती

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: सध्या शहराच एकूणच रुग्णांची संख्या स्थिरावते आहे. या कालावधीत नवीन येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे पण काही काळासाठी मृत्यूदर वाढताना दिसतोय. कारण, जे पंधरा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण असतात, त्यांचा उपचारादरम्यान किंवा प्रकृतीत सुधारणा न झाल्याने विशिष्ट कालावधीत मृत्यू होण्यास सुरुवात होते. त्यामुळे, मृत्यू वाढलेले दिसतात. पण हे काही काळापुरते असते, अशी भीती राज्य टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. रुग्ण वाढायला लागले की त्यापाठोपाठ मृत्यूची लाटही येते. सध्या रुग्णसंख्या जरी स्थिरावली असली तरी मृत्यूमध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.

काही काळापुरता म्हणजेच किमान 10 ते 12 दिवस हा ट्रेंड राहिल. मग, हळूहळू ही लाटदेखील ओसरेल. 15 मे पर्यंत आपल्याला अचूक अंदाज लागेल. एप्रिल अखेरपर्यंत रुग्णांचा दर जर असाच राहिला, तर हे प्रमाण कमी झालेले दिसेल. कारण मृत्यूदर हा थोडासा वाढून पुन्हा कमी होतो, असे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले.

चार महिन्यात 101 मृत्यू

गेल्या चार महिन्यांच्या पालिकेच्या आकडेवारीनुसार, 21 जानेवारी 2021 ला 10 मृत्यू नोंदवण्यात आले होते. 21 फेब्रुवारीला फक्त 6 मृत्यू नोंदवण्यात आले होते. त्यानंतर, 21 मार्चला 10 मृत्यूंची नोंद होती. पण 21 एप्रिल या दिवशी ही संख्या सात पटीने वाढून 75 वर पोहोचली. म्हणजेच फक्त चार महिन्यात मुंबईत 101 मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या मुंबईत 12 हजार 576 मृत्यूंची नोंद झालेली आहे. दरम्यान, अजूनही मुंबईचा मृत्यूदर 2 असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. हा मृत्यूदर पहिल्या लाटेदरम्यान 5.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुंबईचा एकूण कोविड मृत्यूदर 2 टक्के आहे. वेळीच योग्य पद्धतीने उपचार मिळत असल्यामुळे मृत्यूदर नियंत्रणात असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.