Corona Vaccination: मुंबईत लवकरच लसीकरणाचं दिलेलं टार्गेट होणार पूर्ण

भाग्यश्री भुवड
Monday, 25 January 2021

लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करता न आल्याने त्रस्त झालेल्या पालिकेला गेल्या दोन दिवसांत मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील 1.25 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना एका महिन्यात लस देण्याचे टार्गेट पूर्ण होईल.

मुंबई: लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करता न आल्याने त्रस्त झालेल्या पालिकेला गेल्या दोन दिवसांत मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत शुक्रवार आणि शनिवारी ठरवलेल्या लाभार्थींपैकी 90 टक्के नागरिक शहरातील विविध केंद्रांवर लस घेण्यासाठी दाखल झाले. अशा परिस्थितीत पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा आशा पल्लवित झाल्या आहेत की जर या वेगाने लसीकरण झाले. तर मुंबईतील 1.25 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना एका महिन्यात लस देण्याचे टार्गेट पूर्ण होईल.

लसीचा दुष्परिणाम आणि कोव्हिन अ‍ॅपमध्ये बिघाड होण्याच्या भीतीने 16 जानेवारीला हळू गतीने सुरू झालेल्या लसीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांत 7,913 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, लसीबद्दल आरोग्य कर्मचार्‍यांमधील शंका दूर होत आहे. कोविन अ‍ॅपने देखील योग्यरित्या कार्य करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अद्याप काही समस्या आहेत जशा की, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लस घेण्यासाठी संदेश जात आहेत. पालिका अधिकार्यांच्या मते अॅपमधील काही त्रुटी दूर करण्याचे कामही केंद्रातर्फे केले जात आहे.

लसीकरणासाठी 3 महत्वाची केंद्रे

मुंबईत 10 लसीकरण केंद्रे असली तरी या 3 केंद्रांवर आरोग्य कर्मचार्‍यांची गर्दी ओसंडून वाहत आहे. 5 दिवसांत परळच्या केईएममध्ये 2330, कांदिवलीच्या बीडीबीएमध्ये 2125 आणि घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात 1993 लाभार्थ्याना ही लस दिली गेली. आतापर्यंत एकूण 13,365 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली आहे.

65 युनिट कार्यरत असणार 

सध्या लसीकरणासाठी एकूण 10 केंद्रांमध्ये 32 युनिट कार्यरत आहेत. मात्र वाढती गर्दी लक्षात घेता 65 हून अधिक युनिट कार्यान्वित होतील.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हे 3 बनतील लसीकरण केंद्र

पालिकेने आता 2 जंबो कोविड केअर सेंटर आणि एका रुग्णालयाला लसीकरण केंद्र बनवण्यास सुरुवात केली आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय, गोरेगावमधील नेस्को आणि दहिसरमधील जंबो कोविड केअर सेंटर ही पुढील लसीकरण केंद्रे असू शकतात. प्रत्येक केंद्रात 15 युनिट्स असतील.

प्रतिसाद मिळाला तर फेब्रुवारीपर्यंत संपेल

सुरुवातीला लाभार्थ्यांचा प्रतिसाद पाहून असे दिसून येत होता की, आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाला सुमारे दोन ते अडीच महिने लागतील. मात्र गेल्या दोन दिवसात त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईतील सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण फेब्रुवारीपर्यंत होऊन जाईल.
सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य) 

हेही वाचा- सावधान! मुंबईत मुलांना शाळेत दाखल करताय, 246 शाळा आहेत अनधिकृत

आठवड्यातून 5 दिवस लसीकरण

मुंबईसह महाराष्ट्रात सध्या लसीकरणाचे काम 4 दिवस सुरू आहे. मात्र या आठवड्यापासून आता लसीकरणाचे काम 5 दिवस चालणार आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona vaccinating 1.25 lakh health workers Target achieving bmc


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Corona vaccinating lakh health workers Target achieving bmc