मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा नियंत्रणात

मिलिंद तांबे
Tuesday, 15 December 2020

मुंबईत सोमवारी 477 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2 लाख 87 हजार 303 झाली आहे.

मुंबई: मुंबईत सोमवारी 477 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2 लाख 87 हजार 303 झाली आहे. दरम्यान सोमवारी मृतांचा आकडा नियंत्रणात आला असून काल 7 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 10 हजार 988 वर पोहोचला आहे. काल 533 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 66 हजार 695 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 327 दिवसांवर गेला आहे. तर 13 डिसेंबरपर्यंत एकूण 21 लाख 275 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.21 इतका आहे. मुंबईत काल नोंद झालेल्या 7 मृत्यूंपैकी 6 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 6  पुरुष आणि 1 महिलांचा समावेश आहे. 7 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत 439 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4 हजार 924 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2 हजार 917 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून सोमवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 458 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

जी उत्तरमध्ये 6 नवे रूग्ण 

जी उत्तरमध्ये काल 6 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये सोमवारी दिवसभरात 2 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3 हजार 756 इतकी झाली आहे. तर 13 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- दाट लोकवस्तीत रुग्ण कमी होण्याचे प्रमुख कारण वाढलेली हर्ड इम्युनिटी? टास्क फोर्स समितीच्या सदस्यांचे मत

दादरमध्ये काल केवळ 2 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4 हजार 689  इतकी झाली आहे. तर 135 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही  2 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4 हजार 481 इतकी झाली आहे. तर 250 एक्टीव्ह रूग्ण आहेत. धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागात सोमवारी 6 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12 हजार 926 वर पोहोचला आहे. तर 398 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 640 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,431, दादरमध्ये 4,381 तर माहीममध्ये 4,087 असे एकूण 11 हजार 899 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona virus 477 new cases 7 more die


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai corona virus 477 new cases 7 more die