बोरीवलीत मुलांना क्रिकेट शिकवायला विख्यात मुंबईकर क्रिकेटपटू येणार... 

कृष्ण जोशी
Friday, 24 July 2020

या मैदानात जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा या सोयींबरोबरच या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून भरीव काम होईल. मुंबईत राहणाऱ्या विख्यात क्रिकेटपटूंनी येथे मुलांना प्रशिक्षण द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. ते मुंबईत असतील तेव्हा येथे प्रशिक्षण देतील. या दृष्टीने माझी त्यांच्याशी बोलणी सुरु आहेत, असे राणे यांनी सकाळला सांगितले. 

मुंबई: बोरीवलीच्या दोडिया मैदानात लहान मुलांना विनामूल्य फुटबॉल व क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी नामवंत स्टार कसोटीपटू येणार आहेत. बोरीवलीचे आमदार सुनील राणे यांनी या मैदानाचा विकास करताना चार ते चौदा वर्षांच्या मुलांसाठी ही क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या मैदानात जॉगिंग ट्रॅक, व्यायामाची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा या सोयींबरोबरच या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून भरीव काम होईल. मुंबईत राहणाऱ्या विख्यात क्रिकेटपटूंनी येथे मुलांना प्रशिक्षण द्यावे, असा माझा प्रयत्न आहे. ते मुंबईत असतील तेव्हा येथे प्रशिक्षण देतील. या दृष्टीने माझी त्यांच्याशी बोलणी सुरु आहेत, असे राणे यांनी सकाळला सांगितले. 

फुटबॉल प्रशिक्षणासाठी एअर इंडिया संघाचे नामवंत खेळाडू तसेच प्रशिक्षक येतील. या दोनही खेळांच्या प्रशिक्षणासाठी जवळच्या परिसरातील होतकरू खेळाडूंमधून प्रत्येकी ४० मुलांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. लॉकडाऊन संपल्यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु होईल, असेही राणे म्हणाले. 

बंद इमारतींमध्ये अभ्यासिका... 

मुलांना क्रीडाविषयक कौशल्ये देण्याबरोबरच त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, म्हणून म्हाडा व महापालिकेच्या बंद पडलेल्या दोन इमारतींमध्ये लवकरच मोठ्या अभ्यासिकाही सुरू करण्यात येतील, असेही राणे यांनी सांगितले. गोराईच्या मॅगसेस मॉलच्या मागे म्हाडाची बंद इमारत होती. त्यातील दोन खोल्या भाडेवसुलीसाठी ठेऊन उरलेल्या सहा-सात खोल्यांमध्ये अभ्यासिका केली जाणार आहे. बोरीवली पूर्वेला ९० फूट रस्त्यावर महापालिकेच्या इमारतीत पहिल्या माळ्यावर मुलांसाठी व दुसऱ्या मजल्यावर मुलींसाठी अभ्यासाची व्यवस्था होईल. येथे दहावीपर्यंतची मुले रोज येऊ शकतील, परिक्षाकाळात हे वाचनालय सर्वांसाठी रात्रीपर्यंत खुले राहील. दोन्हीकडे प्रत्येकी शंभर मुलांची सोय होऊ शकेल, सध्या वास्तूची रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्त्या सुरु असून येथे रॅक, खुर्च्या, कपाटे व पुस्तकेही आणली जात आहेत. येथे अभ्यासाबरोबरच, मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्रे, स्फूर्तीदायक पुस्तके, महापुरुषांची पुस्तके वाचायला मिळतील. १५ ऑगस्ट रोजी ही वाचनालये सुरु होतील, असेही राणे म्हणाले.

संपादक- सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai cricketer is coming to Borivali to teach cricket to children