आपल्याला एखादा खिळा ठोकताना हातोडी जरी लागली तरी मोठी इजा होते, इथे तर थेट डोक्यात घातलाय हातोडा

सुमित बागुल
Tuesday, 2 February 2021

मुंबई शहर कायमच विविध कारणांनी चर्चेत राहतं. मुंबईत नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई : मुंबई शहर कायमच विविध कारणांनी चर्चेत राहतं. मुंबईत नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कुणी निर्घृणतेचा किती मोठा कळस गाठू शकतं याचंही उत्तम उदाहरण म्हणजे ही अंगावर शहारा आणणारी बातमी.

आपल्याला एखादा खिळा ठोकताना हातोडी जराही लागली तरीही कमालीची इजा होते. मात्र वरळीत थेट एका ५० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात हातोड्याने भीषण वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प होणार सादर, आशियातील सर्वात श्रीमंत मनपाच्या अर्थसंकल्पात काय आहे अपेक्षित ?

ज्या इसमावर निर्घृणपणे वार करण्यात आलेत, त्या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या साथीदाराच्या मुसक्या आवळ्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. 

हत्या झालेली व्यक्ती पन्नास वर्षीय असून मुंबईतील वरळी भागातील एका बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून कार्यरत होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी आणि मृत व्यक्तीची काही कारणास्तव बाचाबाची झाली होती. मृत व्यक्तीमुळे आरोपीची नोकरी गेल्याचेही पोलिसांच्या माहितीतून समोर येतंय. आपली नोकरी गेल्याचा राग डोक्यात ठेऊन आरोपीने मृत व्यक्तीवर हातोड्याने डोक्यावर भीषण हल्ला केला. पीडित व्यक्तीला काहीही समजण्याआधी थेट डोक्यावर वार झाल्याने ५० वर्षीय इसम दगावला. 

महत्त्वाची बातमी :  एकीकडे कोरोना असतानाही असं काय झालं की ठाणे महापालिका झाली मालामाल

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवला. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून आता इतरांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जातेय. पोलिसांच्या चौकशीत ताब्यात असलेल्या आरोपीने गुन्हा कबुल केलेला आहे. 

mumbai crime news wachman being attacked by his ex colleagues after losing job


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai crime news wachman being attacked by his ex colleagues after losing job