मुंबईच्या डबेवाल्यांनाही हवाय मेट्रोमध्ये प्रवेश!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

शासकीय, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या साहेबांना आम्ही जेवणाचा डबा पोचवायला जातो. ते साहेब मेट्रो-मोनोने जातात.

मुंबई : मुंबईत मेट्रो, मोनो सुरू झाल्याने प्रवाशांसाठी चांगली सोय झाली. मात्र, मेट्रो आणि मोनोमधून प्रवास करण्यास डबेवाल्यांना प्रवेश नाही. त्यामुळे मोनो आणि मेट्रोमध्ये डबेवाल्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शासकीय, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या साहेबांना आम्ही जेवणाचा डबा पोचवायला जातो. ते साहेब मेट्रो-मोनोने जातात. मात्र, त्यांचा डबा पोहचविणारे आम्ही डबेवाले मात्र त्या मेट्रो-मोनोतून प्रवास करू शकत नाही. आम्हा डबेवाल्यांनाही मेट्रो-मोनोमधून प्रवास करू द्यावा, अशी मागणी तळेकर यांनी केली आहे. 

मुंबई दिवसेंदिवस वेगवान होत चालली आहे. पश्‍चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर लोकलवरील गर्दीचा ताण कमी व्हावा म्हणून मुंबईत मोनो, मेट्रोचे जाळे विणले जात आहे. चेंबूर-सातरस्ता मोनो रेल्वे चालू आहे. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वे चालू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे चालू आहेत. या मोनो-मेट्रोमधून डबेवाल्यांना प्रवेश देण्यात यावा, असे तळेकर म्हणाले.

याबाबत लवकरच मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीने एमएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Dabbawala wants to access in Metro