
राज्यात लोडशेडींग आणखी वाढणार! अडीच हजार मेगावॅट वीजेची तूट
मुंबई : उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. असे असतानाच कोळसा उपलब्ध नसल्याने अपुऱ्या वीज निर्मितीमुळे सुमारे राज्यात अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी आणि ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार असल्याचे ‘महावितरण’ने जाहीर केले आहे.
फेब्रुवारीपासून राज्यात उष्णतेच्या लाटांची तीव्रता सातत्याने वाढत आहे. औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचाही वीजवापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात २८ हजार मेगावॉटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबईवगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल चार हजार मेगावॉटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल २४, ५०० ते २४, ८०० मेगावॉटवर पोहोचली आहे.
वीज संकट तीव्र
विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी २५,५०० मेगावॉटवर जाण्याची शक्यता आहे. सध्या रात्रीच्या वेळातही २२, ५०० ते २३ हजार मेगावॉट विजेची मागणी आहे. महावितरणची स्थापित क्षमता ३३ हजार ७०० मेगावॉट असून त्यापैकी एकूण २१ हजार ५७ मेगावॉट (६२ टक्के) औष्णिक विद्युत क्षमता आहे. परंतु देशभरात कोळसा टंचाई असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या करारीत औष्णिक वीजनिर्मितीत देखील घट झालेली आहे. तसेच काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने महावितरणला सध्या औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल सहा हजार मेगावॉटने कमी वीज उपलब्ध होत आहे. वीजटंचाईमुळे शेजारच्या आंध्र प्रदेशमध्ये औद्योगिक ग्राहकांना ५० टक्के वीजकपात सुरु करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येही औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येत आहे. तसेच इतर राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांसह अन्य ग्राहकांच्या वीजपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येत आहे.
‘कोयना’मुळे आधार
कोयना जलविद्युत प्रकल्पातून सध्या १८०० मेगावॅट विजेची निर्मिती सुरु आहे. येत्या ३१ मे पर्यंत जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण निर्धारितपैकी आता १७.६० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. एरवी वीज निर्मितीसाठी दररोज ०.३० टीएमसी पाणीवापर होत असताना विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सध्या तब्बल ०.७० टीएमसी पाणीवापर सुरु आहे. पाणी वापरावर मर्यादा असल्याने व सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता वीज निर्मितीसाठी आणखी १० टीएमसी पाणीसाठा वापरण्यास जलसंपदा विभागाने विशेष मंजुरी दिली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाकडून वीजनिर्मितीमधील पाण्याची मर्यादा वाढल्याने वीजटंचाईपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
अतिरिक्त विजेची खरेदी
अतिरिक्त वीज मिळविण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून गेल्या २८ मार्चपासून १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट विजेचा पुरवठा सुरु झाला आहे. सोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) ७६० मेगावॅट वीज खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, त्यापैकी ४१५ मेगावॅट वीज आज मध्यरात्रीपासून उपलब्ध झालेली आहे. खुल्या बाजारात (पॉवर एक्सचेंज) विजेच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी वाढल्याने प्रतियुनिट वीज खरेदीचे दर महागले आहेत. परंतु जादा दर देण्याची तयारी असून सुद्धा खुल्या बाजारामध्ये खरेदीसाठी अपेक्षित प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
ग्राहकांना आवाहन
सध्याच्या अभुतपूर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेची मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Web Title: Mumbai Deficit Two Half Thousand Megawatts Weight Regulation Intense Rsn
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..