esakal | Mumbai: दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

extra ST are available for Diwali

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे 1 हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती देतानाच या जादा गाडया आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात, तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज 1000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा.

हेही वाचा: जुन्नर : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश मंत्री, ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

दरम्यान, प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या http://public.msrtcors.com/ व MSRTC Mobile Reservation App या अधिकृत संकेतस्थळ व मोबाईल अँपवर आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

loading image
go to top