आणखी किती दिवस ट्रेन बंद ठेवणार; हायकोर्टचा राज्य सरकारला सवाल

सुनीता महामुणकर
Friday, 11 September 2020

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तरीही आता आपल्याला कोरोना विषाणूसह रहावे लागणार आहे. त्यामुळे आणखी किती दिवस ट्रेन बंद ठेवणार, असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तरीही आता आपल्याला कोरोना विषाणूसह रहावे लागणार आहे. त्यामुळे आणखी किती दिवस ट्रेन बंद ठेवणार, असा सवाल आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला.

वकिलांसह अन्य अनेक कर्मचारी कामानिमित्त प्रवास करीत आहेत. आता सहा महिने झाले आहे. त्यामुळे त्यांचीही अडचण होत आहे, असे न्यायालय म्हणाले. रेल्वेमधून वकिलांना प्रवास करायला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच अनेक वकिलांनी याबाबत अर्ज केले आहेत. आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

वकिलांना ईपास देऊन ज्या दिवशी सुनावणी असेल त्या दिवशी परवानगी द्यावी, असे खंडपीठाने सुचविले. यावर विचार करु, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात सांगितले आहे. जर सरसकट रेल्वे सुरू केली तर कोरोनाचा धोका वाढू शकतो, असे ही ते म्हणाले. सध्या फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना रेल्वेची मुभा आहे.

सरसकट सर्वांना प्रवेश नको, मात्र न्यायालयातही प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे, असे खंडपीठ म्हणाले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Mumbai High Court has asked the state government how many more days the train will be closed