मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणे म्हणजे...; मुंबई HC चा रिक्षाचालकाला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

मुलीचा हात धरून प्रेम व्यक्त करणे म्हणजे...; मुंबई HC चा रिक्षाचालकाला दिलासा

मुलीचा हात पकडून प्रेम व्यक्त करणे म्हणजे विनयभंग होऊ शकत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षाचालकाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केल्याचा आरोप रिक्षाचालकावर करण्यात आला होता.

हे प्रकरण 1 नोव्हेंबर 2022 चे असून, पीडितेच्या वडिलांनी 17 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि हात धरून विनभंग केल्याप्रकरणी धनराज बाबूसिंह राठोड या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, राठोड आणि पीडित मुलीच्या कुटुंब जवळजवळ राहत असल्यामुळे एकमेकांना परिचित होते. अनेकदा मुलीला शाळेत आणि शिकवणीला जाण्यासाठी पीडित मुलगी राठोडच्याच रिक्षाने प्रवास करत असे.

घटनेच्या दिवशी राठोडने मुलीला थांबवून तिला रिक्षातून प्रवास करण्यास सांगितले. परंतु, मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर राठोडने मुलीचा हात धरून तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली.

यानंतर पीडितेने घटनास्थळावरून पळ काढला तसेच घरी येऊन घडलेला सर्वप्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर न्यायमूर्ती डांगरे यांनी आरोपीवर लावण्यात आलेले विनयभंगाचे आरोप निराधार असल्याचे सांगत त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात कोर्टाने आरोपांवरून, प्रथमदर्शनी असे दिसून येईल की, या घटनेत लैंगिक अत्याचाराचे कोणताही प्रकार निदर्शनास येत नाहीये. कारण आरोपीने कोणत्याही चुकीच्या हेतूने मुलीचा हात धरलेला नाही.

दिलासा देण्याबरोबरच न्यायालयाने आरोपीला भविष्यात अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करणार नाही आणि तसे केल्यास त्याला अटकेपासून संरक्षण देणारा आदेश मागे घेण्यात येईल अशी ताकीद दिली आहे.