Mumbai : जीन्स वॉशिंग कंपनी विरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वॉशिंग कंपनी

Mumbai : जीन्स वॉशिंग कंपनी विरोधात गुन्हा दाखल

डोंबिवली : उच्च दाबाने वीज पुरवठा होत असलेल्या ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी महावितरणकडून करण्यात येत आहे. यासाठी मंडल स्तरावर विशेष पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. टिटवाळा येथील गुरवली पाडा येथे असलेल्या जीन्स वॉशिंग कंपनीत या पथकाने पाहणी केली असता कंपनीने मीटर बायपास करत वीज चोरी करत असल्याचे आढळून आले.

तब्बल 25 लाख 85 हजाराची वीज चोरी कंपनीने केल्याचे निष्पन्न झाल्याने जागामालक व कंपनीच्या चालका विरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज ग्राहक विकास दळवी व वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती यांच्याविरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जानेवारीला महावितरणच्या तपास पथकाने गुरवली पाड्यातील काळू नदी ब्रिज जवळील जीन्स वॉशिंग कंपनीच्या गाळ्याचा वीज पुरवठ्याची तपासणी केली होती. यावेळी मीटरकडे येणारी केबल छतावर कट करुन टॅपिंग केल्याचे पथकास दिसून आले.

मीटर टाळून या टॅपिंग केलेल्या केबलच्या सहाय्याने वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आले. त्यानुसार वीज चोरीचे देयक भरण्याबाबत कंपनीस नोटीस बजावण्यात आली होती. विहीत मुदतीत रक्कमेचा भरणा न झाल्याने महावितरणने मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे हे पुढील तपास करत आहेत.