मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी

भाग्यश्री भुवड
Tuesday, 12 January 2021

कोरोना काळात जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी आई आणि बाळाचे प्राण वाचवण्याची यशस्वी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

मुंबई: कोरोना काळात जे जे रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांची स्तुती जेवढी केली जाईल तितकी कमी आहे. कोविड नसलेले रुग्णालय असूनही, शेवटच्या क्षणी आणि गंभीर अवस्थेत प्रसूतीसाठी दाखल झालेल्या 192 कोविड पॉझिटिव्ह महिलांची सुखरुप प्रसूती करून डॉक्टरांनी आई आणि बाळाचे प्राण वाचवण्याची यशस्वी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

कोरोना काळात काही डॉक्टरांना माहित होतं की, त्यांना कोरोना रूग्णांवर उपचार करावे लागतील, तर काहीजण अनवधानाने गरजू लोकांवर उपचार करत होते. शिवाय, वेळेवर उपचार मिळाले नसते काहींना आपला जीव गमावावा लागला असता. मुंबईतील प्रतिष्ठित शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय जेजे हे एकमेव रुग्णालय आहे. जे लॉकडाऊनमध्ये इतर रुग्णांच्या उपचारांसाठी नॉन-कोविड ठेवण्यात आले होते.

जेजे रुग्णालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 192 पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती केली आहे. लॉकडाउनच्या वेळी, अनेक रुग्णालये संसर्गाच्या भीतीने प्रसूती करत नव्हते आणि तपासणी केल्याशिवाय कोणताही धोका पत्करणे कठीण होते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बर्‍याच गर्भवती महिलांच्या प्रसूतीतील गुंतागुंत लक्षात घेत त्यांना शेवटच्या क्षणी जेजे रुग्णालयात पाठवले गेले. त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत त्यांची प्रसूती झालेली असायची. 

आमच्याकडे पर्याय नव्हता

आम्ही गर्भवती महिलांसाठी ट्रान्झिट वॉर्ड तयार केला होता. सर्व महिलांची चाचणी घेतली जात होती. मात्र आम्हाला अहवाल प्राप्त होईपर्यंत एकतर नैसर्गिक प्रसूती किंवा सिझेरियन व्हायची. रुग्ण प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात रूग्णालयात यायचे, आम्हाला अहवालाची वाट पाहायला वेळ मिळत नव्हता. काळजी आणि जोखीम घेऊन आई आणि बाळाचे आयुष्य वाचवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. त्यासाठी आमच्या विभागाने परिश्रम घेतले आहेत.
प्रा. डॉ. राजश्री कटके, विभाग प्रमुख, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्र, जे जे रुग्णालय

हेही वाचा- राज्यातील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन

प्रसूती नंतरच शिफ्ट प्रसूती

डॉ.कटके म्हणाले की बर्‍याच गर्भवती महिलांमध्ये लक्षणे नसतात तर काहींना या आजाराची लक्षणे देखील असतात. प्रसूतीनंतर पॉझिटिव्ह महिलांची आरोग्याची स्थिती पाहता, त्यांना गंभीर स्थितीत कामा किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आले.

सरकारी रुग्णालयांची चांगली कामगिरी

कोविड युगात जेव्हा खासगी रुग्णालये रूग्णांवर उपचार करण्यास घाबरत असत तेव्हा फक्त सरकारी रुग्णालयांनी कोविड आणि कोविड नसलेल्या रुग्णांवर उपचार केले. यावरुन हे सिद्ध झाले की सरकारी रुग्णालये आणि डॉक्टर सर्व आपत्ती हाताळण्यास सक्षम आहेत.
डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय

एकजुटीने शक्य

या कामात एक जोखीम होती, मात्र आमच्या डॉक्टरांनी पूर्वकल्पना घेऊन कार्य पार पाडले. विभागाच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले.
डॉ. रणजित मानकेश्वर, अधिष्ठाता, जे जे रुग्णालय

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai j.j.hospital Admirable performance doctor Safe delivery of pregnant mothers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai j.j.hospital Admirable performance doctor Safe delivery of pregnant mothers