Mumbai : कल्याण लोकसभेवर सुभाष भोईरांचे नाव ही चर्चेत वाढदिवसाचे बॅनरवर भावी खासदार म्हणून उल्लेख Mumbai Kalyan Lok Sabha Subhash Bhoira name mentioned future MP birthday banner | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार सुभाष भोईर

Mumbai : कल्याण लोकसभेवर सुभाष भोईरांचे नाव ही चर्चेत वाढदिवसाचे बॅनरवर भावी खासदार म्हणून उल्लेख

डोंबिवली : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आखणी करण्यास सुरुवात केली आहे. मतदारसंघात आढावा बैठका घेत पक्षाचे मजबुतीकरण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली कंबर कसली आहे. जागा वाटपाच्या चर्चा सध्या सुरु असून त्या जागांवर आपली वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये ही चढाओढ लागली असल्याचे दिसते.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे याचे प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघावर भाजपाने आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर महाविकास आघाडीने देखील या ठिकाणी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा होत असतानाच ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त शहरात पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे भोईर हे लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र असून सहापैकी तीन जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे तर अंबरनाथमध्ये शिवसेना तर कळवा मुंब्रा मध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व असून येथे भाजपाने आपली मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे ग्रामीण भागात सक्रीय झाल्याचे दिसतात. ठाकरे गटाकडून त्यांना कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख पद दिले आहे.

भोईर यांनी 2014 साली विधानसभा निवडणूक लढवित विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 साली शिवसेनेकडून ऐन टाईमला त्यांचे तिकीट रद्द करत रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले गेले होते. यामुळे भोईर हे नाराज होते. ठाण्यातून भोईर यांना कायम डावलले जात असल्याची चर्चा होती. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर भोईर यांना पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखविण्याची संधी निर्माण झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठाकरे गटाचा एक चेहरा आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले भोईर यांच्याकडे पाहिले जात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून या मतदार संघाची जागा लढविण्यासाठी सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. भाजपाने या मतदार संघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महाविकास आघाडीनेही बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरु होताच ठाकरे गटाकडून भोईर यांच्या नावाला पाठिंबा दिला जात आहे.

2 जून ला माजी आमदार सुभाष भोईर यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर 'आपला भावी खासदार', 'लोकसभा जिंकणारच' अशा शुभेच्छा भोईर यांना कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यामुळे भोईर यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे.