Mumbai : कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : कल्याण ग्रामीण मधील उत्तर भारतीयांचा मनसेत प्रवेश शिवसेनेला धक्का

डोंबिवली : कल्याण ग्रामीण परिसरातील सागाव चिरागनगर भागात उत्तर भारतीय नागरिकांची मोठी वस्ती आहे. सागाव परिसरात शिवसेनेचे वर्चस्व पहिल्यापासून राहीले आहे. शिवसनेत तयार झालेल्या दुफळीनंतर उत्तर भारतीयांना आपल्या गटात सामील करुन घेण्यासाठी शिंदे व ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरु आहे. असे असतानाच उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेचे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे सागांव येथून शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण ग्रामीण भागातील सागाव, चिरागनगर येथे उत्तर भारतीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. राज्यातील घडामोडींनंतर शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे गटाकडून या भागातील उत्तर भारतीयांना आपल्या गटात खेचण्यासाठी, येथील आपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्षातील हा अंतर्गत कलह आणि श्रेयवाद याला कंटाळून येथील उत्तर भारतीय तरुणांनी शनिवारी मनसेत प्रवेश केला. हिंदुत्वाचा जयजयकार करत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मनसे आमदार प्रमोद( राजू) पाटील यांच्या विकास कामांमुळे आम्ही मनसेत प्रवेश करत असल्याचे यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर भारतीय नागरिकांच्या समस्या,

त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटीबद्ध असेल असे यावेळी अध्यक्ष विनोद पाटील यांनी सांगितले. उत्तर भारतीय संघटनेचे पदाधिकारी किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, तुषार पाटील, दिनेश पाटील, अरुण जांभळे यांसह अनेक मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणूका पाहता पक्ष बांधणीसाठी मनसेने शहराच्या विविध भागातील ज्ञाती संघटनांना आपल्या पक्षात घेण्याचे नियोजन केले असून या पार्श्वभूमीवर अनेक पक्षप्रवेश यापुढे होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.