esakal | घरात 3 मोलकरणी काम करत असतील तर पत्नीला 50 हजार निर्वाह भत्ता द्यावा; उच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

घरात 3 मोलकरणी काम करत असतील तर पत्नीला 50 हजार निर्वाह भत्ता द्यावा; उच्च न्यायालय

घरामध्ये तीन मोलकरणी काम करतात याचाच अर्थ पतीची जीवनशैली उच्च वर्गातील आहे असे स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदविले आहे.

घरात 3 मोलकरणी काम करत असतील तर पत्नीला 50 हजार निर्वाह भत्ता द्यावा; उच्च न्यायालय

sakal_logo
By
सुनिता महामुणकर


मुंबई  : घरामध्ये तीन मोलकरणी काम करतात याचाच अर्थ पतीची जीवनशैली उच्च वर्गातील आहे असे स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदविले आहे. तसेच व्यावसायिक पतीने आपल्या पत्नीला महिना पन्नास हजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा असे आदेश न्यायालयाने पतीला दिले आहेत.

उद्योजक असलेल्या नवर्याविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. पतीच्या राहणीमानानुसार पत्नीलाही स्वतः ची जीवनशैली सुधारण्याचा अधिकार आहे, असे मत न्या. एस यू बाघेल यांनी व्यक्त केले आहे. घरामध्ये काम करण्यासाठी तीन मोलकरीण आहेत, यावरून पतीचे आणि त्याच्या आई वडिलांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे हे सिद्ध होते, तसेच पतीने जमा केलेल्या आयकर परताव्यातही याबाबत स्पष्टता येते असेही न्यायालयाने सुनावले आहे.

जीएसटीमुळे मला व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मी निर्वाह भत्ता देऊ शकत नाही असा युक्तिवाद पतीकडून करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. जरी नुकसान झाले असले तरीही पत्नीने त्याची झळ का सोसावी, तिलाही चांगल्या प्रकारे जगण्याचा अधिकार आहे, असे न्यायालय म्हणाले. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

पत्नीने सन 2019 मध्ये पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची फिर्याद दाखल केली आहे. पतीचे मासिक उत्पन्न पंचवीस कोटी रुपये आहे, त्यामुळे मला त्याने दोन लाख रुपये निर्वाह भत्ता द्यावा अशी मागणी दंडाधिकारी न्यायालयात केली होती. न्यायालयाने पतीला पन्नास हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध पतीने दिंडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका नामंजूर केली.

आपले उत्पन्न कमी आहे हे दाखविण्याची जबाबदारी पतीवर होती. मात्र त्याबाबत त्याने पुरेशी कागदपत्रे दाखल केली नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

--------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

mumbai latest 3 maids are working house the wife should given 50 thousand mumbai high court live update